अग्रलेख : आधुनिक तुकाराम; दुधात विष भेसळ करणाऱ्यांचा कर्दनकाळ…

136

अन्न व औषध प्रशासन विभागात एका धडाकेबाज अधिकाऱ्याची एन्ट्री होते, काही दिवसांतच राज्यभर दुग्धजन्य पदार्थांच्या साठ्यांवर धाडसत्र सुरू होते आणि अचानक संपूर्ण महाराष्ट्रात दूध, पनीर आणि माव्याचा प्रचंड तुटवडा भासू लागतो. हे चित्र जितके धक्कादायक आहे, तितकेच ते विचार करायला लावणारे आहे. तुकाराम मुंढेंच्या एका कारवाईने जर बाजारपेठेतील दुधाचा पुरवठा विस्कळीत होत असेल, तर याचा सरळ आणि साधा अर्थ असा की, आजवर आपण जे दूध, पनीर म्हणून खात होतो, ते निव्वळ पांढरे विष होते! या कारवाईने केवळ भेसळखोरांचे कंबरडे मोडले नाही, तर आपल्या भ्रष्ट व्यवस्थेचा बुरखाही टराटरा फाडला आहे.

पण प्रश्न असा पडतो की, इतके दिवस लाखो लहान मुले, वृद्ध आणि सामान्य नागरिकांच्या पोटात हे विषारी पदार्थ जात होते, या पापाची भरपाई कोण करणार? ज्या शासकीय अधिकाऱ्यांच्या, नेत्यांच्या आणि अभय देणाऱ्यांच्या ‘कृपेने’ हे मृत्यूचे धंदे राजरोस सुरू होते, त्यांना कधी बेड्या ठोकल्या जाणार? महाराष्ट्रात एक साधी आणि दुर्दैवी पद्धत रूढ झाली आहे; कोणताही प्रामाणिक अधिकारी अ‍ॅक्शन मोडमध्ये आला की भ्रष्ट यंत्रणेचे धाबे दणाणतात. आताही हीच भीती आहे की, या धडक कारवाईमुळे दुखावलेली लॉबी एकत्र येईल, राजकीय वरदहस्ताने मुंडेंची पुन्हा तडकाफडकी बदली केली जाईल आणि हे काळे धंदे पूर्ववत सुरू होतील. पैशांच्या हव्यासापोटी सामान्य माणसाच्या जीवाशी खेळणाऱ्या या व्यवस्थेला लाज वाटली पाहिजे.

अन्न भेसळीच्या बाबतीत आपल्या देशातील कायदे आणि अंमलबजावणी किती तोकडी आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. परदेशांत, विशेषतः युरोपीय देश किंवा आखाती देशांमध्ये अन्नात भेसळ करणाऱ्यांना थेट जन्मठेप किंवा फाशीसारख्या कठोर शिक्षेची तरतूद आहे. तिथे मानवी जिवाची किंमत आहे. आपल्याकडे मात्र काही हजारांचा दंड आणि काही दिवसांची कोठडी देऊन हे गुन्हेगार पुन्हा सुटतात आणि नवीन ताकदीने लोकांच्या ताटात विष वाढू लागतात. सरकार, न्यायालय आणि प्रशासन जर या नराधमांना वेसण घालू शकत नसेल, तर आता सामान्य नागरिकांनाच तिसरा डोळा उघडावा लागेल.

प्रशासनाच्या भरवशावर राहून आपले आरोग्य धोक्यात घालण्यापेक्षा, एक सजग नागरिक म्हणून आपण स्वतःहून पावले उचलू शकतो. ही भेसळीची साखळी (Chain) तोडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ‘बहिष्कार’! ज्या पदार्थांमध्ये भेसळीची सर्वाधिक शक्यता असते, अशा दूध, पनीर, खवा आणि माव्यासारख्या दुग्धजन्य पदार्थांवर पुढील ६ महिने संपूर्ण बहिष्कार घाला. ६ महिने हॉटेलमधील पनीर नाही खाल्ले किंवा मिठाई नाही खाल्ली, तर कोणी मरणार नाही; उलट शरीरात जाणारे विष नक्कीच थांबेल. जेव्हा मागणी घटेल, तेव्हाच या नफेखोरांचे डोळे उघडतील.

शासन आणि कंत्राटदार यांच्या अभद्र युतीला तोडण्यासाठी ग्राहकांचे हे असहकार आंदोलन अत्यंत गरजेचे आहे. जनतेच्या आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी लढणाऱ्या तुकाराम मुंढेंसारख्या अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानतानाच, आता ग्राहकांनीही आत्मपरीक्षण करून घरात येणाऱ्या पांढऱ्या विषावर बंदी घालण्याची वेळ आली आहे, हेच खरे!

प्रफुल गोरख कांबळे 

संपादक, युवा प्रभाव न्यूज

Email : YuvaPrabhav@gmail. com