शाब्बास अभिजित ! सत्तेची खुर्ची हलवणारा आंदोलनाचा ऐतिहासिक विजय!

68

अखेर सत्तेचा अहंकार गळून पडला आणि जनक्रोशापुढे दिल्लीच्या सिंहासनाला झुकावेच लागले. ‘नीट’ (NEET-UG 2026) परीक्षा घोटाळा, लागोपाठ झालेली पेपरफुटी आणि लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी झालेल्या खेळखंडोबाची जबाबदारी स्वीकारत अखेर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. दिल्लीच्या जंतर-मंतरवरून पेटलेली आंदोलनाची ठिणगी, सोनम वांगचुक यांचा २६ दिवसांचा प्रदीर्घ अन्नत्याग, पोलिसांची दमनशाही, लाठीहल्ला आणि देशभरातून उठलेला जनसागर, या सर्वांचा एकत्र परिणाम म्हणजे केंद्र सरकारला स्वीकारावा लागलेला हा नामुष्कीजनक माघार आहे.

परंतु, या संपूर्ण संघर्षाचा केंद्रबिंदू आणि ज्याने या आंदोलनाची धग शेवटपर्यंत पेटती ठेवली, तो तरुण म्हणजे अभिजित दीपके! म्हणून आज संपूर्ण देश एकमुखाने आणि अभिमानाने उद्गारत आहे—”शाब्बास अभिजित!”

एका तरुणाचा निर्धार आणि सत्तेची धडधड!

जेव्हा सिस्टीम गंजते आणि सरकार बहिरे होते, तेव्हा व्यवस्थेला वठणीवर आणण्यासाठी एखाद्या अभिजितसारख्या निष्ठावंत आणि लढाऊ नेतृत्वाची गरज असते. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला ताकद देणे असो, पोलिसांच्या लाठ्या-काठ्यांचा सामना करणे असो किंवा मुंबईच्या शिवतीर्थापासून ते दिल्लीच्या रस्त्यांपर्यंत तरुणांची वज्रमूठ बांधणे असो—अभिजित दीपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या लढ्यात स्वतःची सर्व ताकद पणाला लावली.

दिल्लीत पोलिसांनी आंदोलकांवर अमानुष लाठीमार केला, तरुणींशी असभ्य वर्तन केले आणि ५० ग्रॅम ड्रग्जच्या खोट्या केसेसमध्ये अडकवण्याच्या धमक्या दिल्या. तरीही अभिजित आणि त्यांच्या साथीदारांचे पाऊल मागे हटले नाही. मुंबईत पोलिसांनी जेव्हा गाडीत आंदोलकांना कोंबण्याचा प्रयत्न केला, तेव्हा रस्त्यावर उतरून पोलिसांची गाडी रोखणाऱ्या त्या रणरागिणीलाही हीच अन्यायाविरुद्धची प्रेरणा अभिजित यांच्या खंबीर नेतृत्वामुळे मिळाली.

राजीनामा ही केवळ पहिली पायरी; लढा अजुन बाकी आहे!

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा या आंदोलनाचा आणि देशातील जागृत तरुणाईचा खूप मोठा नैतिक विजय आहे. सत्तेत बसलेल्यांना वाटत होते की, दुर्लक्ष करून किंवा पोलिसांच्या बळाचा वापर करून हे आंदोलन चिरडता येईल. परंतु, २० जुलैच्या ‘संसद मार्च’च्या हाकेने आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून दिल्लीकडे निघालेल्या जनसागराने सरकारची झोप उडवली.

पण ही संघर्षाची केवळ पहिली पायरी आहे.

महाराष्ट्र आणि ‘टीईटी’ घोटाळा: केंद्रात धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला असला, तरी महाराष्ट्रातील ‘टीईटी’ (TET) पेपरफुटी आणि ६ लाख भावी शिक्षकांच्या आयुष्याशी खेळ करणाऱ्या राज्य सरकारची जबाबदारी अजून बाकी आहे. महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या राजीनाम्याची मागणी अजूनही प्रलंबित आहे.

परीक्षा पद्धतीत सुधारणा: केवळ मंत्री बदलून भागणार नाही, तर ‘नीट’ आणि इतर स्पर्धा परीक्षांमधील भ्रष्टाचार आणि माफिया राजवट समूळ नष्ट करावी लागेल.

तरुणाईचा विजय आणि लोकशाहीचा श्वास

अभिजित दीपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे सिद्ध करून दाखवले की, जर हेतू प्रामाणिक असेल आणि संविधानावर निष्ठा असेल, तर दिल्लीचे तख्त कितीही शक्तिशाली असले तरी त्याला झुकावेच लागते. “शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा ही क्षुल्लक गोष्ट आहे, आता व्यवस्था बदलली पाहिजे,” असा संदेश देत या आंदोलनाने देशातील तरुण पिढीला नवा स्वाभिमान दिला आहे.

सोनम वांगचुक यांच्या त्यागाला, अभिजित दीपके यांच्या अदम्य साहसाला आणि रस्त्यावर उतरलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला ‘युवा प्रभाव’चा सलाम! हा विजय केवळ एका राजीनाम्याचा नाही, तर तो या देशातील लोकशाहीचा आणि भविष्याचा विजय आहे.

शाब्बास अभिजित! तुमची ही लढाई इतिहासाच्या पानांवर सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाईल!

प्रफुल गोरख कांबळे 

– संपादक, युवा प्रभाव न्यूज

ईमेल : yuvaprabhav@gmail.com