सोलापूर : चौकीदाराने जागे राहावे की झोपावे? तुमचा आशीर्वाद आहे, त्यामुळे चौकीदार लढत आहे. चौकीदार झोपत नाही, अंधार झाल्यावर चोरांना पकडतो, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधाकांवर टीका केली. ‘केवळ हेलिकॉप्टरच नव्हे तर इतर लढाऊ विमानांच्या घोटाळ्यातही हात असलेल्यांचे मिशेल मामा कनेक्शन आता शोधावेच लागणार, त्यांचा भ्रष्टाचार बाहेर येत आहे. म्हणून घाम फुटलेले आता चौकीदाराला चोर म्हणून हिणवत आहे,’ या भाषेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘राफेल आरोप’प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आजच्या सोलापूर दौऱ्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन नरेंद्र मोदी केले. सोलापूर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत आतापर्यंत झालेल्या कामाचे उद्घाटन, माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने अक्कलकोट रस्त्यावर कुंभारी येथे तब्बल 30 हजार असंघटित कामगारांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलांची पायाभरणी, उजनी धरण ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे भूमिपूजन, सोलापूर-उस्मानाबाद-येडशी महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधानाच्या हस्ते करण्यात आले. यावेळी, नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणवीस, केंद्रीय वाहतूक व भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी, राज्यपाल के.विद्यासागरराव यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते, मंत्री, आमदार, खासदार उपस्थित होते.







