३०० कोटींचा ‘नाला सफाई घोटाळा’ उघड! मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते राकेश शंकर शेट्ठी यांचा महायुती सरकार आणि बीएमसीवर थेट हल्लाबोल

308

मुंबई: मुंबईत मान्सूनपूर्व नाला सफाईच्या नावाखाली तब्बल ३०० कोटी रुपयांचा महाघोटाळा (Nalla Safai Scam) झाल्याचा खळबळजनक आरोप मुंबई प्रादेशिक काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते राकेश शंकर शेट्टी यांनी केला आहे. पावसाळा तोंडावर आलेला असतानाही मुंबईतील नाल्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर असून, प्रत्यक्षात जमिनीवर कोणतेही काम सुरू नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

या संदर्भात राकेश शेट्टी यांनी थेट घटनास्थळाची पाहणी करत महायुती सरकार आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) कारभाराचे वाभाडे काढले आहेत.

कागदावर कोटींच्या गप्पा, जमिनीवर मात्र शुकशुकाट!”

राकेश शेट्टी यांनी आज मुंबईतील एका प्रमुख नाला सफाईच्या ठिकाणाला प्रत्यक्ष भेट दिली. या पाहणीनंतर त्यांनी तेथील धक्कादायक वास्तव सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडले:

कंत्राटदार आणि कामगार गायब: पाहणी दरम्यान घटनास्थळावर ना कोणती यंत्रसामग्री होती, ना कोणी कंत्राटदार वा कामगार उपस्थित होता. नाला सफाईचे कोणतेही काम प्रत्यक्षात सुरू नसल्याचे समोर आले आहे.

कोट्यवधींचा चुराडा: प्रत्यक्ष काम शून्य असतानाही कंत्राटदारांना कोट्यवधी रुपयांची बिले कशी अदा केली गेली? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. हा सरळ सरळ जनतेच्या पैशांची लूट करणारा ३०० कोटींचा घोटाळा असल्याचा आरोप त्यांनी केला.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी

या गंभीर प्रकरणाची दखल घेत राकेश शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेत्या रितू तावडे आणि बीएमसीच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांना समाजमाध्यमांवर टॅग करत जाब विचारला आहे.

मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ: “मुंबईत पावसाळ्यापूर्वी स्वच्छ करणे गरजेचे असते. जर वेळीच नाले साफ झाले नाहीत, तर मुंबई पुन्हा एकदा पाण्याखाली जाण्याचा आणि आरोग्याचा मोठा धोका निर्माण होईल,” असे शेट्टी यांनी म्हटले आहे.

कारवाई कधी होणार? एवढा मोठा घोटाळा उघडकीस आल्यानंतर आता महायुती सरकार आणि बीएमसी प्रशासन या भ्रष्ट कंत्राटदारांवर आणि दोषी अधिकाऱ्यांवर कधी कारवाई करणार? याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

पावसाळा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असताना काँग्रेसने लावून धरलेल्या या ३०० कोटींच्या नाला सफाई घोटाळ्यामुळे मुंबई महानगरपालिका आणि सत्ताधारी महायुती सरकार बॅकफूटवर जाण्याची शक्यता असून, यावर आता प्रशासन काय उत्तर देते याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.