खारघर : एका भरधाव डंपरने दुचाकीस्वार तरुण वकिलाला चाकाखाली चिरडल्याची संतापजनक घटना सोमवारी सायंकाळी घडली. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी तातडीने रास्तारोको केला. आरोपीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची यावेळी संतप्त नागरिकांकडून करण्यात आली. या घटनेमुळे खारघर शहरात शोकाकुल वातावरण आहे.
या भीषण अपघातात २८ वर्षीय वकील महेश लोहार यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातावेळी महेश लोहार यांच्या दुचाकीवर मागे बसलेले सहकारी वकील हे या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार आहेत, त्यांनी दिलेल्या जबाबामुळे या दुर्घटनेचे वास्तव समोर आले आहे.
साक्षीदार वकिलांने दिलेल्या माहितीनुसार, डंपरने दुचाकीला धडक दिल्यानंतर त्यांनी चालकाला वारंवार ओरडून “थांबा… थांबा…” असे सांगितले. महेश चाकाखाली सापडणार असल्याची स्पष्ट जाणीव करून देऊनही चालकाने दगडाने भरलेल्या ओव्हरलोड दहा चाकी डंपरचे चाक महेश यांच्या अंगावरून पुढे नेले. अशी माहिती त्यांनी दिली आहे. या निष्काळजी आणि अमानवी कृतीने पोलिसही स्तब्ध झाले आहेत.
अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेनंतर आरोपी चालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला आणि डंपर मालकाला तत्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या (ठाकरे गट) नगरसेविका लीना गरड यांनी केली आहे. घटनेची माहिती मिळताच त्यांनी खारघरवासीयांसह रास्तारोको आंदोलनात सहभाग घेतला.
महेश लोहार हे मूळचे कराडचे. शिक्षण आणि संगोपन खारघरमध्येच झाले. गोखले विद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले महेश सामाजिक कार्यात सहभागी असत. स्वराज्य युवा मित्र मंडळाचे अध्यक्ष आणि खारघर कॉलनी फोरमचे सक्रिय सदस्य म्हणून त्यांनी परिसरातील अनेक समस्या सोडविण्यासाठी त्यांनी काम केले होते. ते नगरसेविका लीना गरड यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते.
बेलापूर आणि पनवेल न्यायालयात वकिली करत असलेले महेश यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ आणि वहिणी असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे खारघर परिसरात शोकाकुल वातावरण आहे. या दुर्दैवी घटनेमुळे निष्काळजी वाहनचालकांविरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिकांमधून होत आहे.






