Law & Constitutional Corner : नागरिकांची मूलभूत कर्तव्ये : सशक्त भारताचा पाया

104

(प्रतिक सावंत) भारतीय संविधान हे आपल्या देशाचे सर्वोच्च कायदेपुस्तक असून ते प्रत्येक भारतीय नागरिकाला अधिकारांसोबत काही कर्तव्यांचीही जाणीव करून देते. अनेकदा आपण आपल्या मूलभूत अधिकारांबद्दल बोलतो, त्यासाठी संघर्ष करतो; परंतु आपल्या मूलभूत कर्तव्यांकडे दुर्लक्ष करतो. म्हणूनच संविधान जनजागृतीची सुरुवात नागरिकांच्या कर्तव्यांपासून होणे अत्यंत आवश्यक वाटते.

भारतीय संविधानाच्या भाग ४-अ मधील अनुच्छेद ५१-क मध्ये नागरिकांची मूलभूत कर्तव्ये नमूद करण्यात आली आहेत. ही कर्तव्ये प्रत्येक भारतीय नागरिकाने पाळणे अपेक्षित आहे. आजच्या सामाजिक परिस्थितीकडे पाहता, लोकांना या कर्तव्यांचा विसर पडत चालल्याचे दिसून येते. त्यामुळे या कर्तव्यांची आठवण करून देणे काळाची गरज आहे.

संविधानानुसार प्रत्येक नागरिकाचे पहिले कर्तव्य म्हणजे संविधानाचे पालन करणे तसेच त्यातील आदर्श, संस्था, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा आदर करणे. आपल्या स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा देणाऱ्या महान आदर्शांचे जतन करणे आणि त्यांचे पालन करणे हे देखील आपले कर्तव्य आहे.

भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता टिकवून ठेवणे व त्याचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. देशाचे रक्षण करणे आणि गरज पडल्यास राष्ट्रीय सेवा बजावणे हेही आपले राष्ट्रीय कर्तव्य मानले गेले आहे.

आपल्या देशात विविध धर्म, भाषा, संस्कृती आणि प्रांत आहेत. या सर्वांमध्ये सामंजस्य आणि बंधुभाव वाढवणे, तसेच स्त्रियांच्या सन्मानाला बाधा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे हे संविधानाने नागरिकांना सांगितले आहे. भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन करणे आणि त्याचे मोल जाणणे हे देखील महत्त्वाचे कर्तव्य आहे.

पर्यावरण संरक्षण हा आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. वने, नद्या, तलाव, वन्यजीव आणि संपूर्ण नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे तसेच सर्व सजीवांबद्दल दयाभाव ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.

वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद, शोधक वृत्ती आणि सुधारणेची भावना विकसित करणे हे समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे आणि हिंसाचाराचा त्याग करणे यामुळे समाजात शिस्त आणि शांतता टिकून राहते.

संविधान प्रत्येक नागरिकाला वैयक्तिक आणि सामूहिक कार्यामध्ये उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करते, जेणेकरून राष्ट्र सतत प्रगतीच्या उच्च शिखरांकडे वाटचाल करू शकेल. तसेच ८६ व्या घटनादुरुस्तीद्वारे पालकांना ६ ते १४ वयोगटातील मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे कर्तव्यही जोडण्यात आले आहे.

जर देशातील प्रत्येक नागरिकाने आपल्या मूलभूत कर्तव्यांचे प्रामाणिकपणे पालन केले, तर भारत देश जगातील सर्वात सामर्थ्यवान, प्रगत आणि आदर्श राष्ट्र बनेल. संविधानाने दिलेली ही कर्तव्ये केवळ कायदेशीर जबाबदारी नसून ती आपल्या राष्ट्रप्रेमाची आणि सामाजिक बांधिलकीची ओळख आहेत.

आपल्या भारतीय संविधान भाग 04 अनुच्छेद – 51- क मध्ये दिले आहेत हे आपल्या प्रत्येकाला आज या लेखाच्या माध्यमातून आठवण करून देत आहे.

51 – क : संविधानाचे पालन करणे व त्याचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा आदर करणे.

51- ख: आपल्या स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा देणाऱ्या उदात्त आदर्शांचे हृदयात जतन करणे व त्यांचे पालन करणे.

51- ग : भारताचे सार्वभौमत्व, एकता आणि अखंडता उन्नत राखणे व तिचे रक्षण करणे.

51- घ : देशाचे रक्षण करणे आणि आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे.

51- ड. : धार्मिक, भाषिक, प्रादेशिक किंवा विभागीय भेद विसरून भारतातील सर्व लोकांमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढवणे; तसेच स्त्रियांच्या सन्मानाला बाधा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे.

५१-च: आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृद्ध वारशाचे मोल जाणून तो जतन करणे.

५१ छ : वने, तलाव, नद्या व वन्यजीवांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे आणि सजीवांबद्दल दयाबुद्धी बाळगणे.

५१ ज : वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक वृत्ती व सुधारणेची भावना विकसित करणे.

५१ झ : सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि हिंसाचाराचा त्याग करणे.

५१ त्र : राष्ट्राला सातत्याने उपक्रम आणि यशाच्या उच्च शिखरांवर नेण्यासाठी वैयक्तिक आणि सामूहिक कार्याच्या सर्व क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करणे.

51 ट : पालकांनी किंवा संरक्षकाने आपल्या ६ ते १४ वयोगटातील पाल्यास शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे (हे कर्तव्य ८६ व्या घटनादुरुस्तीद्वारे जोडले गेले आहे)

लेखक – प्रतिक सावंत

मुंबई.

Email : p.v.s.05081991@gmail.com

👉 वाचा आणि शेयर करा 

👉 व्हॉट्सॲप ग्रुप मध्ये जॉइन व्हा.

👉 नवनवीन आणि ताज्या घडामोडीसाठी साठी वाचत रहा.

www.YuvaPrabhav.Com

An Independent Marathi News Portal.