“सरकार बदला!”; शिवतीर्थावरून उद्धव ठाकरेंचा थेट एल्गार, सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला दिला पाठिंबा.

254

मुंबई: दिल्लीच्या जंतर-मंतरवर शिक्षण सुधारणांसाठी उपोषणाला बसलेले प्रसिद्ध कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवत मुंबईतील ऐतिहासिक दादर येथील शिवतीर्थावर (शिवाजी पार्क) एका भव्य सभेचे आयोजन केले होते. या सभेदरम्यान सोनम वांगचुक आणि अभिजित दीपके यांच्या समर्थनार्थ आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. याप्रसंगी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या घणाघाती भाषणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) सडकून टीका केली.

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा क्षुल्लक, आता सरकारच बदलावे लागेल!”

सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले की, हा लढा आता केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित राहिलेला नाही.

राजीनामा पुरेसा नाही: “मी आताच एक पोस्टर पाहिले, ज्यावर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. पण धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही अत्यंत क्षुल्लक गोष्ट आहे. जे सरकार तरुणांना रोजीरोटी, रोजगार आणि दर्जेदार शिक्षण देऊ शकत नाही, ते सरकारच आता बदलण्याची गरज आहे,” असे ठाकरे म्हणाले.

तरुणांना आवाहन: “मी इथे नेतृत्व करायला आलेलो नाही, तर तुम्हा तरुणांना ‘नेते व्हा’ हे सांगायला आलो आहे. केंद्रातील सत्ताभ्रष्टांना बाहेर काढल्याशिवाय आपण राहणार नाही, अशी शपथ घेऊन या आंदोलनाला गती द्या. ही आग सरकार बदलेपर्यंत धगधगती राहिली पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.

आमचे हिंदुत्व शेंडी-जाणव्याचे नाही”; मोदींवर प्रहार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावर आणि राजकीय भूमिकेवर निशाणा साधताना उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून टोला लगावला. ते म्हणाले, “काही जण म्हणतात, ‘मेलोडी खाओ खुद जान जाओ’. तिकडे चॉकलेटच्या गोळ्या दिल्या जातात आणि आमच्या हक्कासाठी लढणाऱ्या तरुणांना मात्र बंदुकीच्या गोळ्या मिळतात. आम्ही हिंदू असून कट्टर देशभक्त आहोत. आमचे हिंदुत्व हे शेंडी-जाणव्याचे नाही.”

संघाच्या भूमिकेवरून सरसंघचालकांना सवाल

आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे आणि सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानांचा दाखला देत मोदी सरकारची कोंडी केली:

पाकिस्तानशी चर्चा, वांगचुक यांच्याशी का नाही?: “मी नागपूरला गेलो होतो, तिथे संघाचे केंद्र आहे. संघाच्या होसबळे यांनी काही दिवसांपूर्वी पाकिस्तानसोबत चर्चा केली पाहिजे, असे विधान केले होते. जो पाकिस्तान भारतात दहशतवादी घुसवतो, आपल्या सैनिकांचे बळी घेतो, त्याच्याशी चर्चेचे दरवाजे खुले ठेवण्याची तयारी दाखवली जाते. मग सैनिकांसाठी ‘सोलार टेंट’ बनवणाऱ्या देशभक्त सोनम वांगचुक यांच्याशी सरकार चर्चा का करत नाही?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

हिटलरचा दाखला: मोहन भागवत म्हणतात की आम्ही हिटलरसारखे नाही. मग भागवत साहेबांनी हे मोदींना समजावून सांगायला हवे, असा टोलाही त्यांनी लगावला.

२० जुलै रोजी दिल्लीत होणाऱ्या ऐतिहासिक ‘संसद मार्च’च्या पार्श्वभूमीवर, मुंबईतील या सभेमुळे सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला महाराष्ट्रातून मोठी राजकीय ताकद मिळाली असून, आगामी काळात हा संघर्ष अधिक तीव्र होणार असल्याचे स्पष्ट चिन्हे आहेत.