पावसाळा तोंडावर पण पालिकेची नालेसफाई कागदावरच? मुलुंडकरांवर पुन्हा ‘जलमय’ संकटाची टांगती तलवार!

53

मुलुंड (मुंबई): केरळमध्ये मान्सून दाखल झाला असून महाराष्ट्रातही पावसाचे आगमन लवकरच होणार आहे. मुंबईकर पावसाची चातकासारखी वाट पाहत असतानाच, दुसरीकडे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) मान्सूनपूर्व तयारीचा बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे. मुलुंड पश्चिमेकडील एका मुख्य नाल्याची सफाई अद्याप न झाल्याने, यंदाही पहिल्याच पावसात मुलुंडकरांच्या घरात आणि रस्त्यांवर पाणी साचण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंड पश्चिमेकडील ‘सिटी ऑफ जॉय’ कॉम्प्लेक्सच्या मागे, जेएसडी (JSD) आणि एसीसी (ACC) रोड परिसरातील मुख्य नाल्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. पावसाळा अगदी दारात आलेला असतानाही या नाल्यातील गाळ आणि कचरा साफ करण्यात आलेला नाही.

पालिकेच्या या संथ आणि निष्काळजी कारभारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. सोशल मीडिया आणि स्थानिक स्तरावर नागरिकांनी पालिकेला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

प्रशासनाचा दावा फोल: दरवर्षी पालिका मान्सूनपूर्व नालेसफाईचे मोठे दावे करते, मात्र प्रत्यक्ष जमिनीवर परिस्थिती वेगळीच असते. जेएसडी आणि एसीसी रोड परिसरातील नाल्याची स्वच्छता न झाल्याने नागरिकांनी उपरोधिकपणे, “मुलुंडकरांनो, यंदाही आपल्या घरात आणि परिसरात साचणार, तयार राहा!” असा टोला प्रशासनाला लगावला आहे.

परिसराला पूरस्थितीचा धोका: हा नाला परिसरातील पाण्याचा निचरा करणारा मुख्य मार्ग आहे. हाच नाला कचऱ्याने तुंबलेला राहिल्यास ‘सिटी ऑफ जॉय’ कॉम्प्लेक्स परिसर आणि आसपासच्या रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी आणि नागरिकांचे नुकसान होऊ शकते.

पालिकेला जाग कधी येणार?

पावसाळा सुरू होण्यापूर्वी नालेसफाई शंभर टक्के पूर्ण होणे अपेक्षित असते. मात्र, मे महिना संपत आला तरी या मुख्य नाल्याची सफाई न होणे हे पालिकेच्या ढिसाळ नियोजनाचे लक्षण आहे, असा आरोप नागरिक करत आहेत. आता पहिल्या पावसाचा तडाखा बसण्यापूर्वी पालिका प्रशासन या नाल्याची तातडीने सफाई करणार की नागरिकांना पुराच्या पाण्यातच दिवस काढावे लागणार, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.

 

👉वाचा आणि शेयर करा,

👉 व्हॉट्स अप ग्रुप मध्ये जॉइन व्हा. 

👉नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी नियमित वाचत रहा. 

www.YuvaPrabhav.Com

An Independent Marathi News Portal.