मुंबई: मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांसाठी एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. राज्यातील नामांकित आणि अत्यंत प्रतिष्ठित मानली जाणारी कोचिंग संस्था ‘महेश ट्युटोरियल्स’ची (Mahesh Tutorials) ३३ कोचिंग सेंटर्स अचानक बंद करण्यात आली आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता संस्था प्रशासनाने घेतलेल्या या धक्कादायक निर्णयामुळे ऐन शैक्षणिक वर्षात इयत्ता १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मुलुंड शाखेपासून झाली बंदची सुरुवात
या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात महेश ट्युटोरियल्सच्या मुलुंड शाखेपासून झाली. मुलुंड शाखेला अचानक कुलूप लावण्यात आले आणि त्यानंतर एकापाठोपाठ एक मुंबईसह राज्यातील इतर ३२ शाखाही बंद करण्यात आल्याचे उघडकीस आले. बोर्डाच्या परीक्षेच्या वर्षात क्लासेस अचानक बंद झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले असून, पालकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.
अरिहंत अकॅडमीमध्ये मिळणार प्रवेश; अतिरिक्त शुल्क नाही
क्लासेस बंद झाल्यानंतर निर्माण झालेला गोंधळ पाहता, संस्थेने तातडीने पालकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, असे आश्वासन संस्थेकडून देण्यात आले आहे.
पर्यायी व्यवस्था: महेश ट्युटोरियल्सच्या सर्व विद्यार्थ्यांना आता ‘अरिहंत अकॅडमी’ (Arihant Academy) मध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
अतिरिक्त शुल्कातून सूट: या बदलीनंतर विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क (No Extra Fees) आकारले जाणार नसल्याचेही संस्था प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
३२ कोटींचे कर्ज आणि दिवाळखोरीचे संकट
१९८८ मध्ये स्थापन झालेली महेश ट्युटोरियल्स ही गेली अनेक दशके महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांची पहिली पसंती होती. मात्र, तिची मूळ कंपनी ‘एमटी एज्युकेअर’ (MT Educare) डिसेंबर २०२२ पासून दिवाळखोरीच्या (Bankruptcy) कायदेशीर प्रक्रियेला सामोरी जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून ही संस्था प्रचंड आर्थिक अडचणीत होती. सध्या संस्थेवर सुमारे ३२.३३ कोटी रुपयांचे कर्ज असल्याची माहिती समोर आली असून, याच आर्थिक संकटामुळे अखेर शाखा बंद करण्याची वेळ आल्याचे बोलले जात आहे.
पालकांचा संताप; शिक्षणमंत्र्यांच्या हस्तक्षेपाची मागणी
लाखो रुपयांचे शुल्क भरूनही कोणतीही पूर्वकल्पना न देता क्लासेस बंद केल्यामुळे पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अभ्यासक्रमाचे नियोजन आणि मुलांचे भवितव्य धोक्यात आल्यामुळे विविध सामाजिक आणि धर्मादाय संस्थांनी थेट शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना पत्र धाडले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी शासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
– ब्युरो रिपोर्ट, युवा प्रभाव न्यूज








