मुंबई: प्रसिद्ध लालबाग आणि काळाचौकी परिसरात गणेशोत्सव कालावधीत घडलेल्या दुर्दैवी घटनांनंतर सुरक्षेतील त्रुटींचा मुद्दा आता अधिकच तापला आहे. महागणपती मंडपात झालेल्या भीषण दुर्घटनेप्रकरणी याचिकाकर्ते ॲड. आशिष राय यांनी राज्य मानवाधिकार आयोगाकडे (State Human Rights Commission) धाव घेतली असून, या प्रकरणाची सखोल मांडणी आयोगासमोर केली आहे.
निरपराध बालक आणि महिलेचा गेला होता जीव
याचिकाकर्ते ॲड. आशिष राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी महागणपती मंडपाच्या परिसरात सुरक्षेच्या अभावामुळे एक अत्यंत गंभीर दुर्घटना घडली होती. या घटनेत एका चिमुकल्या बालकासह एका महिलेला आपला जीव गमवावा लागला होता, तर अनेक भाविक आणि नागरिक गंभीर जखमी झाले होते. सार्वजनिक गणेशोत्सवात सुरक्षेची योग्य खबरदारी न घेतल्यामुळे ही जीवितहानी झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मानवाधिकार आयोगाकडे दाद; सविस्तर अहवाल सादर
या दुर्घटनेची गंभीर दखल घेत ॲड. आशिष राय यांनी काल राज्य मानवाधिकार आयोगाकडे अधिकृत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आज त्यांनी आयोगासमोर प्रत्यक्ष उपस्थित राहून या संपूर्ण प्रकरणाचा, सुरक्षेतील त्रुटींचा आणि प्रशासकीय हलगर्जीपणाचा सविस्तर अहवाल सादर केला.
“सार्वजनिक मंडपांमध्ये गर्दीचे व्यवस्थापन आणि भाविकांची सुरक्षा ही प्राथमिक जबाबदारी असायला हवी. मात्र, येथे सुरक्षेचे नियम पायदळी तुडवले गेले,” असा दावा करत याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याची आणि पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्याची मागणी त्यांनी मानवाधिकार आयोगाकडे केली आहे.








