रामदास आठवले यांच्या सभेत गोंधळ, खुर्च्यांची तोडफोड.

प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात काम करण्यास तयार : रामदास आठवले.

281

औरंगाबाद : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या औरंगाबादेतील सभेत तरुणांनी तुफान तोडफोड केली असून, तुरळक दगडफेक झाल्याचे वृत आहे. ह्यावेळी ऐक्यासाठी मंत्रीपद सोडून प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार असल्याचे प्रतिपादन रामदास आठवले यांनी केले आहे. नामविस्तार दिनाच्या निमित्ताने आयोजित सभेत ते बोलत होते.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले या सभेत बोलत असताना त्यावेळी श्रोत्यांमधील एका व्यक्तीने आक्षेपार्ह विधान केले. सुरुवातीला काही जणांनी घोषणाबाजी केली. यानंतर दोन गटांमध्ये जोरदार वाद झाला. यामध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांवर खुर्च्या फेकण्यात आल्या. तसेच तुरळक दगडफेक झाल्याचेही वृत्त आहे. या सगळ्या प्रकारानंतर पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

गेल्यावर्षीही नामविस्तार दिनाच्या कार्यक्रमात आठवले यांना भाषणादरम्यान असाच गोंधळाचा सामना करावा लागला होता.

काही दिवसांपूर्वीच अंबरनाथ येथील सभेत रामदास आठवले यांना प्रवीण गोसावी नावाच्या व्यक्तीने कानशिलात लगावली होती. या घटनेनंतर रामदास आठवले यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली होती.