पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले, भीमा नदीचे उगमस्थान असलेले आणि १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे भीमाशंकर अभयारण्य आज एका अत्यंत गंभीर संकटाचा सामना करत आहे. एका खाजगी कंपनीच्या प्रकल्पासाठी अभयारण्यातील तब्बल ६०० एकर क्षेत्रावरील हजारो झाडांची कत्तल सुरू असल्याच्या बातम्यांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
पर्यावरणाचा समतोल राखणाऱ्या, दुर्मिळ वनस्पती आणि वन्यजीवांचे आश्रयस्थान असलेल्या या पवित्र आणि संवेदनशील भूमीवर चालवलेली ही कुऱ्हाड म्हणजे निसर्गावर केलेला थेट सर्जिकल स्ट्राइकच आहे!
‘शेकरू’चे घर आणि नैसर्गिक वारसा धोक्यात
भीमाशंकरचे जंगल हे केवळ झाडांचा समूह नसून तो महाराष्ट्राचा ‘राज्यप्राणी – शेकरू’ (खार) याच्या अस्तित्वाचा पाया आहे. दाट झाडी, उंच वृक्ष आणि नैसर्गिक परिसंस्था यामुळेच इथे शेकरू आणि अनेक दुर्मिळ पक्षी, प्राणी सुखाने राहतात. ६०० एकरचे जंगल उद्ध्वस्त झाले, तर या मुक्या प्राण्यांनी जायचे कुठे? निसर्गाची ही साखळी एकदा तुटली की ती पुन्हा जोडणे अशक्य आहे.
‘विकास’ कोणाचा आणि ‘विनाश’ कोणाचा?
‘प्रकल्पा’च्या नावाखाली ६०० एकर जमीन एखाद्या खाजगी कंपनीच्या घशात घालणे ही कसली प्रगती? ज्या जंगलाला घडायला हजारो वर्षे लागली, ते जंगल काही दिवसांत भुईसपाट केले जात आहे.
• एकीकडे सरकार कोट्यवधी रुपये खर्चून ‘वृक्षारोपण मोहिमा’ राबवण्याच्या बाता मारते.
• दुसरीकडे, आधीच अस्तित्वात असलेली नैसर्गिक, दाट जंगले खाजगी भांडवलदारांच्या फायद्यासाठी उद्ध्वस्त करायला परवानगी देते.
हा उघड-उघड दुटप्पीपणा आणि पर्यावरणाचा केलेला सौदा आहे.
प्रशासकीय दुर्लक्ष की संशयास्पद मूकसंमती?
अभयारण्यासारख्या अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या क्षेत्रात हजारो झाडांवर कुऱ्हाड चालवली जात असताना वन विभाग आणि स्थानिक प्रशासन काय करत होते? जेव्हा हे प्रकरण सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये तापते, तेव्हा वन विभाग सोयीस्करपणे ‘आव्हाने’ आणि ‘स्पष्टीकरणे’ जारी करतो. परंतु, प्रत्यक्षात झाडे तोडणाऱ्या कंपनीवर आणि याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई का केली जात नाही?
जनतेचा आणि तरुणाईचा सवाल:
“निसर्गाने समृद्ध असलेला महाराष्ट्र आपल्याला पुढच्या पिढीला द्यायचा आहे की सिमेंटचे आणि उध्वस्त झालेल्या जंगलांचे वाळवंट?”
भीमाशंकर ही केवळ पर्यटनाची किंवा अध्यात्माची जागा नाही, तर तो महाराष्ट्राचा ‘ऑक्सिजन हब’ आहे. आज जर आपण या अवैध वृक्षतोडीविरोधात आणि प्रशासकीय दुर्लक्षाविरोधात आवाज उठवला नाही, तर उद्या आपल्याकडे पश्चात्तापाशिवाय काहीही उरणार नाही.
महाराष्ट्रातील जनतेकडून या प्रकरणावर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. आणि तातडीने भीमाशंकर अभयारण्यातील सर्व प्रकारचे काम आणि वृक्षतोड तात्काळ थांबवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. झाडांची कत्तल करणाऱ्या कंपनीवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर उच्चस्तरीय चौकशी करून गुन्हे दाखल झाले पाहिजेत.
पर्यावरण आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी जनतेने, तरुणांनी आणि पर्यावरणप्रेमींनी एकत्र येऊन या विनाशाविरोधात जोरदार आवाज उठवण्याची वेळ आली आहे! 🌳✊🔥

✍️ प्रफुल गोरख कांबळे
संपादक : युवा प्रभाव न्यूज
www.Yuvaprabhav.Com
✉️: yuvaprabhav@gmail.com








