गणपतीच्या मूर्ती मुलुंड डंपिंग मध्ये भग्न अवस्थेत; मनसे नेते अविनाश जाधव यांची प्रशासनावर खरपूस टीका…

53

मुंबई  : गणेशोत्सव काळात भक्त मोठ्या भक्तिभावाने गणपतीची प्रतिष्ठापना करतात, त्याच गणपतीच्या मूर्ती तुटलेल्या आणि अत्यवस्थ अवस्थेत मुलुंड येथील डम्पिंग परिसरात दिसून आल्याने मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी संताप व्यक्त केला.

गणपती मूर्तींची झालेली अवस्था पाहून त्यांनी प्रशासनाच्या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. “ज्या गणपतीला आपण देव मानतो, त्याच गणपतीची अशी अवस्था होत असेल तर हिंदू खरंच खतरे में आहेत का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच मुंबई महापालिकेतील सत्ताधारी भाजपवर टीका केली.

मुंबईत भक्त भाविक आपल्या घरात गणपतीची प्रतिष्ठापना करतात. मनोभावे पूजा-अर्चा केली जाते. सार्वजनिक मंडळांमध्येही मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. मात्र, विसर्जनानंतर याच गणेशमूर्तींची योग्य प्रकारे विल्हेवाट आणि पुनर्प्रक्रिया होत आहे का, हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

मुंबई आणि ठाणे शहरात यंदाच्या गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्तींचे विसर्जन झाले. विसर्जनाच्या वेळी अनेक भाविक गणरायाला निरोप देताना भावूक झाले. भाविकांनी विसर्जनापूर्वी मूर्तीची पुन्हा पूजा केली, आरती केली आणि डोळ्यांत अश्रू आणून बाप्पाला निरोप दिला. परंतु विसर्जनानंतर त्याच मूर्तींची अवस्था काय होते, हा प्रश्न कायम उपस्थित केला जातो.

याच पार्श्वभूमीवर मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी मुलुंड परिसरातील मूर्तींच्या साठवणुकीच्या ठिकाणी पाहणी केली. या ठिकाणी अनेक गणेशमूर्ती तुटलेल्या आणि अवशेषांच्या स्वरूपात पडलेल्या दिसून आल्या. हे दृश्य पाहून जाधव यांनी संताप व्यक्त केला.

भाजपमुळे खरच हिंदू खतरे में….

अविनाश जाधव यांनी भाजपवर सडकून टीका केली. भाजपमुळे खरच हिंदू खतरे में आले आहे. मुंबई महापालिकेवर हिंदूत्त्ववादी सरकार.. ज्यांनी आयुष्यभर प्रभू श्री राम आणि हिंदू, हिंदू.. करत सत्तेत आले. हे लोक करोडो रुपयांच्या निविदा काढतात. त्यामध्ये लहान आकाराचे कृत्रिम तलाव तयार करतात, विसर्जन घाट म्हणून ते यासाठीच का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हिंदूत्त्वाच्या नावावर दलाली करण्याचे काम भाजप करते अशी टीका त्यांनी केली. गणपती दान करु नका, ही परिस्थिती असेल तर असे हिंदूत्त्व आम्हाला नकोय..ढोल, डीजे लावण्यासाठी आवाज उठवता ना.. मग यासाठी आवाज उठवा.. आणि नसेल उठवणार तर तुम्ही शंढ आहात असेही जाधव म्हणाले.