Sahil Wakode Case: IIT मुंबई विद्यार्थी आत्महत्या, विद्यार्थी पालक आक्रमक, IIT प्रशासन बॅकफुटवर..

67

मुंबई : IIT मुंबईतील विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या संशयास्पद आत्महत्येनंतर विद्यार्थ्यांनी  तीव्र आंदोलन सुरू केले आहे. विद्यार्थ्यांच्या आक्रमक पावित्र्यापुढे अखेर प्रशासनाने नमते घेतले असून संस्थेचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी स्टुडंट कौन्सिलने संचालकांकडे १८ मागण्यांचे निवेदन सादर केले आहे.

रविवारी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या परिसरातून मोर्चा काढला. संस्थेतील कार्यपद्धती, विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, वैद्यकीय सेवा व संस्थात्मक उत्तरदायित्वाशी संबंधित विविध मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. प्रा. सूर्यनारायण डुल्ला यांच्यासह घटनेला जबाबदार अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, साहिलच्या पार्थिवावर येथील वडगाव रोड मोक्षधामात दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या

साहिलच्या मृत्यूची स्वतंत्र चौकशी करावी. चौकशी समितीत प्राध्यापक, विद्यार्थी, बाह्य सदस्य असावेत. रुग्णालयातील उपचार प्रक्रियेचीही चौकशी करावी. चौकशीचा अंतरिम अहवाल ३० सप्टेंबरपर्यंत जाहीर करावा. अंतिम अहवाल १५ ऑक्टोबरपूर्वी सार्वजनिक करावा. लिंक्डइन पोस्टप्रकरणी संस्थेने सार्वजनिक माफी मागावी. २२ सप्टेंबरपूर्वी विद्यार्थ्यांसोबत खुली बैठक घ्यावी. अलीकडे मृत्यू झालेल्या चार विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत द्यावी. विद्यार्थी प्रतिनिधींना समित्यांमध्ये मतदान अधिकार द्यावा. प्रशासनाला विद्यार्थी मतावर एकतर्फी नकाराधिकार नकोत. विद्यार्थ्यांवर परिणाम करणारे निर्णय घेण्यापूर्वी मत घ्यावे. प्रत्येक २५० विद्यार्थ्यांमागे एक समुपदेशक द्यावा. प्रत्येक वसतिगृहात किमान एक समुपदेशक असावा. खुले विद्यार्थी तक्रार व्यासपीठ सुरू करावे. तक्रारी आणि प्रशासनाची उत्तरे विद्यार्थ्यांना पाहता यावीत. संबंधित प्राध्यापक व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. शांततापूर्ण आंदोलनकर्त्यांवर शिस्तभंगाची कारवाई नको. आंदोलनकर्त्यांवर वसतिगृह, आर्थिक किंवा कायदेशीर कारवाई करू नये.

आयआयटी मुंबई हे दलित विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे केंद्र बनले असून, संस्थेत जातीय छळ होत असल्याचा आरोप बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केला आहे. अनिकेत अंभोरे, दर्शन सोलंकी यांच्यानंतर आता साहिल वाकोडे यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. देशातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये जातीय भेदभावाचा प्रश्न गंभीर होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

या पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबईचे संचालक आणि डीन यांचा तातडीने राजीनामा घेण्याची मागणी त्यांनी केली.