मुंबई: क्रांती दिनाचे औचित्य साधून ९ ऑगस्ट रोजी मुंबईतील नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी एका भव्य आणि शांततापूर्ण आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. ‘एकता एनजीओ – द पॉवर ऑफ यूथ अँड युनिटी’ (Ekta NGO – The Power of Youth & Unity) या संघटनेच्या वतीने मुलुंड ते कांजुरमार्ग आणि लगतच्या परिसरात पसरलेल्या सुमारे २५६ एकर मिठागरांच्या जमिनीचे रक्षण करण्यासाठी ९ ऑगस्ट २०२६ रोजी ‘नमक सत्याग्रह’ (#NamakSatyagrah) आयोजित करण्यात आला आहे.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राकेश शंकर शेट्टी यांनी संपूर्ण मुंबईकरांना या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपला आवाज उठवण्याचे आक्रमक आवाहन केले आहे.
विकासविरोधी नाही, तर जबाबदार विकासाची मागणी!
राकेश शेट्टी यांनी यावेळी स्पष्ट केले की, हा लढा विकासाच्या विरोधात नसून ‘जबाबदार आणि शाश्वत विकासासाठी’ (Responsible Development) आहे. मुंबईमध्ये मिठागरांचे क्षेत्र हे केवळ जमिनीचा तुकडा नसून, ते पावसाळ्यात शहरात येणाऱ्या पुराला रोखणारे मुख्य नैसर्गिक संरक्षक कवच (Flood Buffers) आहे. तसेच हे क्षेत्र मुंबईच्या पर्यावरणाचा समतोल राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे येणाऱ्या भावी पिढ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी या २५६ एकर मिठागरांचे जतन करणे अत्यंत गरजेचे आहे.
क्रांती दिनाच्या दिवशीच आंदोलनाची साद
९ ऑगस्ट हा ऐतिहासिक ‘क्रांती दिन’ म्हणून ओळखला जातो. याच दिवशी सामान्य माणसाने आपल्या हक्कासाठी, जमिनीसाठी आणि भविष्यासाठी एकत्र येत मोठा लढा उभारला होता. त्याच ऐतिहासिक क्रांती भावनेतून प्रेरणा घेऊन या आंदोलनाची आखणी करण्यात आली आहे.
आंदोलनाची रूपरेषा:
स्थळ: मिठागर, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, मुलुंड (पूर्व), मुंबई
दिनांक: रविवार, ९ ऑगस्ट २०२६
वेळ: सकाळी ११:०० वाजता
मुंबईचे नैसर्गिक अस्तित्व आणि हवामान समतोल टिकवण्यासाठी प्रत्येक नागरिकाची उपस्थिती आणि आवाज महत्त्वाचा आहे, असे सांगत या ‘नमक सत्याग्रह’ आणि ‘#SaveSaltPans’ मोहिमेत सर्व स्तरांतील मुंबईकरांनी एकत्र यावे, असे आवाहन राकेश शेट्टी यांच्याकडून आणि एकता संघटनेकडून करण्यात आले आहे.








