खासगी वाहनांवर ‘पोलीस’ पाटी लावून हुकूमशाही करणाऱ्यांना दणका; अपर पोलीस महासंचालक कार्यालयाचे कारवाईचे आदेश

54

मुंबई: पोलीस अधिकारी आणि अंमलदारांकडून स्वतःच्या खासगी चारचाकी आणि दुचाकी वाहनांवर ‘पोलीस’ अशी लाल रंगाची पाटी लावून किंवा लाल अक्षरात ‘पोलीस’ लिहून फिरण्याच्या वाढत्या प्रकारांवर आता राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. अशा खासगी वाहनांचा वापर बेकायदेशीर कामांसाठी, लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी आणि तपासणी टाळण्यासाठी केला जात असल्याच्या तक्रारींनंतर, अशा वाहनांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहेत.

तक्रार आणि उच्च न्यायालयाचे ताशेरे

​श्री. सखाराम कुलकर्णी यांनी २७ जून २०२६ रोजी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्याकडे पाठवलेल्या तक्रार अर्जाची दखल घेत हे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

​तक्रारीत नमूद केल्यानुसार:

  • तपासणी टाळण्याचा प्रयत्न: अनेक पोलीस अधिकारी आणि अंमलदार आपल्या खासगी गाड्यांवर लाल पाटी किंवा ‘पोलीस’ असे नाव लिहून फिरतात. ‘पोलीस’ पाटी असल्यामुळे नाकाबंदी किंवा तपासणी दरम्यान या गाड्या सहसा चेक केल्या जात नाहीत.
  • बेकायदेशीर वापराची शक्यता: तपासणी होत नसल्याचा गैरफायदा घेऊन अशा गाड्या भाडेतत्त्वावर देणे किंवा अवैध वस्तूंची वाहतूक करण्यासाठी वापरल्या जाण्याची शक्यता निर्माण होते.
  • न्यायालयाची नाराजी: उच्च न्यायालयानेही खासगी वाहनांवर अशा पाट्या लावण्याबाबत यापूर्वीच तीव्र नाराजी व्यक्त करून कठोर कारवाईचे निर्देश दिले होते.

या कायद्यांन्वये होणार कारवाई

​अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) कार्यालयाचे पोलीस अधीक्षक (मुख्यालय) डॉ. सुनील भारद्वाज (भा.पो.से.) यांच्या स्वाक्षरीने ३१ जुलै २०२६ रोजी हे पत्र राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालयांना पाठवण्यात आले आहे.

​अर्जातील मागणीनुसार, खासगी वाहनावर ‘पोलीस’ पाटी आढळल्यास:

  • महाराष्ट्र मोटार वाहन नियम १९८९ चे कलम १३३(६)
  • मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम १७७

​या नियमांतर्गत दोषींवर थेट दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्यभरातील सर्व पोलीस यंत्रणांना आदेश

​हे आदेश बृहन्मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर यांसह राज्यातील सर्व पोलीस आयुक्तांना तसेच सर्व जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांना तात्काळ उचित कारवाईसाठी पाठवण्यात आले आहेत. या निर्णयामुळे खासगी वाहनांवर ‘पोलीस’ नाव लावून नियम मोडणाऱ्या आणि सर्वसामान्य नागरिकांवर रुबाब झाडणाऱ्यांना मोठा चाप बसणार आहे.

– ब्युरो रिपोर्ट, युवा प्रभाव न्यूज