मिठागरे वाचवण्यासाठी मुलुंडकरांचा एल्गार; एकीचे बळ दाखवत सरकारला दिला इशारा..

173

मुंबई : मुलुंड येथील मिठागरांच्या (Salt Pans) जमिनींवर प्रस्तावित धारावी पुनर्वसन प्रकल्पाविरोधात स्थानिक नागरिकांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. मिठागर बचाव समिती, मुलुंड यांच्या नेतृत्वाखाली रविवारी भव्य जनआंदोलन करण्यात आले.

पर्यावरणीय संतुलन, पूरनियंत्रण आणि मुलुंडच्या पायाभूत सुविधांवर होणाऱ्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सरकारच्या या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला.

आंदोलनादरम्यान नागरिकांनी मिठागरे (Salt Pans) ही केवळ मोकळी जमीन नसून मुंबईच्या पर्यावरणीय व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असल्याचे अधोरेखित केले. मुसळधार पावसाच्या काळात अतिरिक्त पाणी साठवून ठेवण्याचे कार्य मिठागरे करतात. त्यामुळे या जागांवर मोठ्या प्रमाणावर बांधकाम झाल्यास मुंबईतील पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता असल्याची भीती पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.

दरम्यान, धारावी पुनर्वसन प्रकल्पातील अपात्र प्रकल्पबाधितांच्या मुलुंड येथील पुनर्वसनाच्या मुद्द्यावरून आधीच मुलुंडकरांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यात आता मिठागरांवरील (Salt Pans) प्रस्तावित गृहनिर्माण प्रकल्पामुळे स्थानिकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा, सार्वजनिक सुविधा आणि इतर पायाभूत सेवांवर अतिरिक्त ताण पडेल, अशी भीती आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

यावेळी उपस्थित नागरिकांनी “मिठागर वाचवा, मुलुंड वाचवा”, “पर्यावरणाचा ऱ्हास थांबवा” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. सरकारने मिठागरांवरील (Salt Pans) प्रस्तावित गृहनिर्माण प्रकल्प तात्काळ रद्द करून या क्षेत्राचे संवर्धन करावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. तसेच नागरिकांच्या भावना आणि पर्यावरणीय परिणामांचा विचार न करता कोणताही निर्णय घेऊ नये, असा इशाराही यावेळी सरकारला देण्यात आला.