महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता मिळवण्यासाठी किंवा ती टिकवण्यासाठी धार्मिक आणि सामाजिक भावनांचा वापर करणे ही काही नवी गोष्ट राहिलेली नाही. परंतु, गेल्या काही काळातील घडामोडी पाहिल्या तर ‘हातामध्ये धम्मचक्र आणि मनात मात्र सत्तेचे राजकारण’ असाच काहीसा प्रकार सध्या राज्यात सुरू आहे की काय, अशी रास्त शंका आंबेडकरी अनुयायी आणि बौद्ध समाजाच्या मनात निर्माण झाली आहे. एका बाजूला शासकीय निवासस्थानी बौद्ध भिक्षूंचा सत्कार करायचा, ‘बुद्धरत्न’ पुरस्कार स्वीकारायचा आणि दुसऱ्या बाजूला त्याच समाजाच्या अस्मितेवर, श्रद्धास्थानांवर थेट बुलडोझर चालवायचा, हा दुटप्पीपणा आता पुरता उघडा पडला आहे.
काही काळापूर्वी, ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे आयोजित आठव्या आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेत राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘बुद्धरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याही आधी, मुख्यमंत्री असताना सप्टेंबर २०२४ रोजी त्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी बौद्ध भिक्षूंसाठी ‘वर्षावास’ निमित्त विशेष बुद्ध वंदना आणि चीवरदान, अन्नदान अशा धम्मदान कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. इतकेच नव्हे तर, आंबेडकरी मतांचे गणित डोळ्यासमोर ठेवून रिपब्लिकन सेनेसोबत युतीचे सोपस्कारही पार पाडले गेले. हे सर्व प्रकार पाहून तेव्हा असे वाटले होते की, सरकारला खरोखरच तथागतांच्या विचारांची आणि आंबेडकरी चळवळीची चाड आहे. परंतु, नुकतीच कल्याणमध्ये घडलेली घटना पाहिली की, हे सर्व प्रकार केवळ बौद्ध समाज आणि आंबेडकर अनुयायांची सहानुभूती मिळवून आगामी निवडणुकांमध्ये त्याचा राजकीय फायदा करून घेण्यासाठी रचलेले एक सुनियोजित ‘थोतांड’ होते का, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.
कल्याण पूर्व येथील वालधुनी, अशोक नगर परिसरातील ‘बुद्ध भूमी’ येथे प्रशासनाने अतिक्रमणाच्या नावाखाली कोणतीही अधिकृत नोटीस किंवा न्यायालयाची ऑर्डर नसताना थेट बुद्धमूर्ती आणि स्मारकांची तोडफोड केली. ही केवळ एका वास्तूची तोडफोड नव्हती, तर ती लाखो अनुयायांच्या अस्मितेवर झालेला थेट आघात होता. शांततेचा आणि करुणेचा संदेश देणाऱ्या बौद्ध भिक्षूंना या कारवाईदरम्यान झालेली मारहाण आणि धक्काबुक्की अत्यंत निषेधार्ह आणि निंदनीय आहे. या संपूर्ण गैरप्रकारात सत्ताधारी पक्षाचे खासदार आणि एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचे नाव समोर येत असल्यामुळे या प्रकरणाची गंभीरताच अधिक वाढली आहे. ठाणे जिल्ह्यातील कोणत्या बड्या नेत्याचा या मौल्यवान जमिनीवर डोळा आहे आणि कोणाच्या इशाऱ्यावरून हा ‘सरकारी आतंकवाद’ घडवून आणला गेला, याचा जाब आता समाज विचारत आहे.
याहूनही अधिक क्लेशदायक आणि शरमेची बाब म्हणजे, या कारवाईनंतर समोर आलेली काही रिपब्लिकन नेत्यांची लाचारी! ज्या समाजाने आणि चळवळीने या नेत्यांना मोठे केले, त्याच समाजाच्या श्रद्धास्थानांची विटंबना होत असताना, काही आरपीआय (RPI) नेते चक्क सरकारच्या या दडपशाहीचे आणि बेकायदेशीर कारवाईचे समर्थन करत आहेत. सत्तेच्या तुकड्यांसाठी आणि पदांच्या लाचारीसाठी आपल्याच समाजाच्या जखमांवर मीठ चोळणारे हे नेते एवढे लाचार कसे झाले? स्वतःला आंबेडकरी चळवळीचे वारसदार म्हणवून घेणाऱ्या या नेत्यांची नैतिक दिवाळखोरी या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे. ‘अत दीप भव‘चा विचार देणाऱ्या समाजात अशा लाचार चमच्यांना आता कोणतीही जागा उरलेली नाही, हाच या नेत्यांना स्पष्ट संदेश आहे.
एकीकडे वर्षा निवासस्थानी भिक्षूंचे पाय धुवायचे आणि दुसरीकडे कल्याणात त्याच भिक्षूंवर हात टाकायचा, ही कोणती करुणा आणि हे कोणते धम्मचक्र? दिखावा करून बौद्ध समाजाची मते पदरात पाडून घेण्याचे दिवस आता संपले आहेत. सत्ताधाऱ्यांनी हे विसरू नये की, हा समाज जितका शांत आणि संयमी आहे, तितकाच तो आपल्या अस्मितेवर होणाऱ्या अन्यायाविरोधात पेटून उठणारा आहे. कल्याणातील बुद्ध भूमी उध्वस्त करणाऱ्या दोषींवर आणि त्यांच्या पाठीशी असलेल्या राजकीय सूत्रधारांवर जोपर्यंत कडक कारवाई होत नाही, तोपर्यंत हा आक्रोश शांत होणार नाही. सरकारने हे ढोंगी राजकारण थांबवावे, अन्यथा या छळपटाचे चोख उत्तर आंदोलनाच्या, निवडणुकीच्या माध्यमातून देण्यास समाज सक्षम आहे.

लेखक – प्रफुल गोरख कांबळे
ईमेल: yuvaprabhav@gmail.com








