मुंबई/विशेष प्रतिनिधी: आपण रोज जे अन्न खातो ते शुद्ध आणि सुरक्षित असावे, हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. बाजारामध्ये मिळणाऱ्या अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत किंवा त्यात होणाऱ्या संभाव्य भेसळीबाबत नागरिकांच्या मनात अनेकदा शंका असतात, मात्र तक्रार नेमकी कुठे करायची, हे अनेकांना माहीत नसते. हीच अडचण दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडून (FDA) एक जाहीर आवाहन करण्यात आले असून नागरिकांसाठी अधिकृत टोल फ्री क्रमांक आणि ई-मेल आयडी जारी करण्यात आला आहे.
अधिकृत माहितीनुसार, नागरिकांच्या आरोग्याशी होणारा कोणताही खेळ खपवून घेतला जाणार नाही, यासाठी प्रशासनाने थेट तक्रार निवारण यंत्रणा कार्यान्वित केली आहे.
अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत शंका असल्यास येथे साधा संपर्क:
जर तुम्हाला कोणत्याही हॉटेल, दुकान किंवा अन्नपदार्थ विक्री केंद्रामध्ये भेसळ किंवा निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ आढळल्यास तुम्ही खालील माध्यमांतून थेट अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधू शकता:
📞 टोल फ्री क्रमांक: १८००२२२३६५ (1800222365)
📧 ई-मेल आयडी: jc-foodhq@gov.in
तक्रार करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या
आपली तक्रार अधिक मजबूत आणि कारवाईस पात्र ठरण्यासाठी नागरिकांनी तक्रार नोंदवताना काही आवश्यक माहिती देणे बंधनकारक आहे. यामध्ये प्रामुख्याने:
संबंधित आस्थापनेचा अचूक पत्ता: ज्या हॉटेल, बेकरी किंवा दुकानाची तक्रार करायची आहे, त्याचा योग्य पत्ता माहित असणे आवश्यक आहे.
भेसळीची सविस्तर माहिती: ज्या अन्नपदार्थात भेसळ होत आहे किंवा ज्याच्या दर्जाबाबत शंका आहे, त्या अन्नपदार्थाची स्पष्ट माहिती नमूद करावी.
‘आपले सरकार’ उपक्रमांतर्गत ग्राहकांचे सक्षमीकरण
महाराष्ट्र शासनाच्या ‘आपले सरकार’ उपक्रमांतर्गत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, यामुळे अन्नपदार्थ क्षेत्रातील काळ्या कारभाराला आणि भेसळखोरांना मोठा लगाम बसेल. नागरिकांनी सतर्क राहून अशा गैरप्रकारांविरोधात पुढे यावे आणि आपल्या आरोग्याच्या रक्षणासाठी या टोल फ्री क्रमांकाचा योग्य वापर करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.








