पेपरफुटीचा सरदार धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे!” मुंबईत युवक काँग्रेसचा भव्य आक्रोश मोर्चा

225

मुंबई: ‘नीट’ (NEET) पेपरफुटी आणि ‘सीबीएसई’ (CBSE) परीक्षांमधील घोटाळ्यावरून देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. या शिक्षण व्यवस्थेच्या दलालीविरोधात आणि लाखों विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या केंद्र सरकारच्या कारभाराविरोधात आज मुंबईच्या रस्त्यांवर युवक काँग्रेसच्या वतीने एक भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

यावेळी आंदोलकांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आग्रही मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली.

छोटे मोहरे बळी पडतायत, मुख्य सूत्रधाराला पाठीशी का?

आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसच्या नेत्यांनी केंद्र सरकार आणि शिक्षणमंत्र्यांवर कडाडून टीका केली.

दलालीविरोधात संताप: आज मुंबईत आंदोलन सुरू असतानाच, दुसरीकडे पेपरफुटीचे मुख्य सूत्रधार स्वतःला वाचवण्यासाठी ‘सीबीएससी’मधील लहान अधिकाऱ्यांवर कारवाईचा फार्स करत आहेत, असा थेट आरोप आंदोलकांनी केला.

पंतप्रधानांना इशारा: “लाखों विद्यार्थ्यांच्या भविष्याचा सौदा करणाऱ्या या ‘लीक प्रधान’ यांचा राजीनामा जोपर्यंत घेतला जात नाही, तोपर्यंत युवक आणि विद्यार्थ्यांचा हा आक्रोश शांत होणार नाही,” हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षात घ्यावे, असा इशारा या वेळी देण्यात आला.

प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष :

मुंबईतील या विराट आक्रोश मोर्च्याचे नेतृत्व युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब आणि मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी केले. त्यांच्यासोबत शेकडो युवक, विद्यार्थी आणि काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.

“हा लढा केवळ राजकीय नसून देशातील लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कासाठी आहे. जोपर्यंत दोषींना शिक्षा होत नाही आणि शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा येत नाही, तोपर्यंत काँग्रेसचे हे आंदोलन थांबणार नाही,” अशी आक्रमक भूमिका दोन्ही नेत्यांनी यावेळी मांडली. या आंदोलनामुळे मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

जॉइन युवा प्रभाव न्यूज व्हॉट्स ॲप ग्रुप..

👇👇👇