कवठे महांकाळ : अलकुड (एस) ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे मागासवर्गीय समाजमंदिर दुरावस्थेत; दीड वर्षांपासून केवळ आश्वासनांचीच खैरात..

119

सांगली : कवठे महांकाळ तालुक्यातील अलकुड (एस) गावातील बौद्ध /मागासवर्गीय समाजाचे समाजमंदिर मागील अनेक वर्षांपासून प्रशासनाच्या आणि ग्रामपंचायतीच्या कमालीच्या दुर्लक्षामुळे अत्यंत दुरवस्थेत आहे. दीड वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा, तक्रारी आणि पत्रव्यवहार करूनही स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप होत आहे.

समाजमंदिराची दुरवस्था; ‘बाबासाहेबांची जयंती’ अंधारात साजरी करण्याची वेळ

अलकुड (एस) येथील या समाजमंदिराची अवस्था सध्या अत्यंत बिकट झाली आहे.

मूलभूत सुविधांचा अभाव: समाजमंदिराच्या खिडक्या आणि फरशा (लादी) पूर्णपणे तुटलेल्या आहेत. इमारतीमध्ये विजेची (लाइट) कोणतीही व्यवस्था नाही.

घाण आणि अतिक्रमण: मंदिराच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य पसरले असून, मागील मोकळ्या जागेवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण देखील करण्यात आले आहे.

अश्लील उद्योग : ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षित कारभारामुळे या समाजमंदिरात कधी कधी कॉन्डम / निरोध ची पाकिटे देखील मिळतात अशी माहितीही स्थानिक नागरिक देत आहेत.

जयंती कशी साजरी करायची? प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे मागील वर्षी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चक्क अंधारात साजरी करावी लागली होती. यंदाही परिस्थिती तीच असल्याने, यंदाची जयंती कशी साजरी करायची, असा गंभीर प्रश्न समाजबांधवांसमोर उभा ठाकला आहे.

अधिकारी आणि सरपंचांचा जातीयवादी दृष्टिकोन?

या समस्येबाबत गेल्या दीड वर्षांपासून ग्रामसेवक श्री. निवृत्ती पाटील, विस्तार अधिकारी के. पाटील आणि स्थानिक सरपंच यांच्याकडे लेखी आणि तोंडी तक्रारी करण्यात आल्या. मात्र, या मंडळींनी तक्रारींना केराची टोपली दाखवली.

शासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दबावामुळे अखेर या कामासाठी दोन वेळा ६८ हजार रुपये आणि १,९१,००० रुपये अशी दोन वेळा टेंडर (निविदा) काढण्यात आली. मात्र, टेंडर काढूनही प्रत्यक्ष कामाचा अद्याप पत्ताच नाही. निधी मंजूर असूनही काम रखडवून ठेवण्यामागे या प्रशासकीय मंडळींचा जातीयवादी दृष्टिकोन दिसून येत असल्याचा थेट आणि गंभीर आरोप स्थानिक समाजबांधवांनी केला आहे.

बीडीओ उल्हास भांगे यांचे दुरुस्तीचे आश्वासन

या प्रकरणाची गंभीर दखल घेत अखेर २६ मे २०२६ रोजी पंचायत समिती कार्यालयात समाजबांधवांनी प्रशासनाची भेट घेतली. यावेळी गटविकास अधिकारी (BDO) श्री. उल्हास भांगे यांनी स्वतः या विषयात लक्ष घालण्याचे मान्य केले आहे. समाजमंदिराची दुरुस्ती, वीज व्यवस्था आणि अतिक्रमणाचा प्रश्न स्वतः लक्ष घालून तातडीने मार्गी लावू, असे आश्वासन त्यांनी उपस्थित समाजबांधवांना दिले आहे.

बीडीओ यांनी आश्वासन दिले असले, तरी आता प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होते आणि अलकुड एस मधील बौद्ध समाजाला त्यांचा हक्क कधी मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.