कल्याणमधील बुद्धमूर्ती तोडफोड आणि भिक्खूंना मारहाण म्हणजे सरकारी आतंकवाद!” ॲड. डॉ. सुरेश माने यांचा फडणवीस सरकारवर घणाघाती आरोप

115

कल्याण/ठाणे: कल्याण येथील ‘बुद्धभूमी’ परिसरात अतिक्रमणाच्या नावाखाली करण्यात आलेली बुद्धमूर्तीची तोडफोड आणि बौद्ध भिक्खूंना झालेल्या मारहाणीच्या प्रकरणावरून आता राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. डॉ. सुरेश माने यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला असून, “हा सरकारचा पोलिसांच्या माध्यमातून सुरू असलेला आतंकवाद आहे,” असा घणाघाती आरोप केला आहे.

या घटनेमुळे ठाणे जिल्ह्यात आणि संपूर्ण बौद्ध समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

ठाण्यातील कोणत्या राजकीय नेत्याचा या जमिनीवर डोळा?”

ॲड. डॉ. सुरेश माने यांनी या कारवाईच्या हेतूवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. “बुद्धभूमीची ही जागा हडप करण्यासाठी सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत का?” असा सवाल त्यांनी केला आहे.

नेत्यांचा भूखंडावर डोळा: ठाणे जिल्ह्यातील कोणत्या बड्या राजकीय नेत्याचा या जमिनीवर डोळा आहे, याचा विचार आता जनतेने करण्याची वेळ आली आहे, असा थेट संशय त्यांनी व्यक्त केला.

दलालांना टोला: सरकारचे जे दलाल आणि चमचे आहेत, त्यांना हा उघड अन्याय आणि धार्मिक स्थळांची विटंबना दिसत नाही का? अशा कडक शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांवर तोफ डागली.

फडणवीस सरकार मर्यादा ओलांडते आहे!”

राज्यातील कायदा व सुव्यवस्था आणि प्रशासनाच्या मनमानी कारभारावर बोट ठेवत डॉ. माने यांनी थेट गृहखात्याला आणि सरकारला धारेवर धरले. “फडणवीस सरकार आता सर्व मर्यादा ओलांडत आहे,” असं आपल्याला आतातरी वाटतंय की नाही, असा सवाल त्यांनी जनतेला आणि विचारवंतांना आवाहन करताना केला. कोणतीही रीतसर नोटीस किंवा न्यायालयाची स्थगिती न पाहता थेट श्रद्धास्थानांवर बुलडोझर चालवणे ही हुकूमशाहीची लक्षणे आहेत, असे ते म्हणाले.

सरकार आणि पोलिसांचा जाहीर धिक्कार

या कारवाईदरम्यान शांततेचा संदेश देणाऱ्या बौद्ध भिक्खूंना झालेल्या मारहाणीबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. लोकशाही मार्गाने आणि शांततेने राहणाऱ्या समाजाच्या धार्मिक भावनांना प्रशासनाने जाणूनबुजून धक्का लावल्याचा आरोप करत त्यांनी सरकार आणि पोलीस यंत्रणेचा जाहीर धिक्कार केला आहे.

या घटनेचे पडसाद आता संपूर्ण राज्यभरात उमटण्याची शक्यता असून, या प्रकरणी दोषी अधिकारी आणि पडद्यामागील सूत्रधार राजकीय नेत्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.

जॉइन युवा प्रभाव न्यूज 👇👇👇