नागपूर: ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातं रोज नाव नवीन घडामोडी घडत आहेत. नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द केल्यानंतर, आता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनीच राजीनामा दिला आहे. श्रीपाद जोशी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा विदर्भ साहित्य संघाच्या ई-मेलवर पाठवला. यात त्यांनी सहकार्याबद्दल साहित्य संघाचे आभारही मानले. थेट अध्यक्षांच्या राजीनाम्यामुळे महामंडळाच्या उपाध्यक्ष विद्या देवधर यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे येण्याची शक्यता आहे.
यवतमाळमध्ये ११ ते १३ जानेवारीदरम्यान ९२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. मात्र हे साहित्य संमेलन सुरुवातीपासूनच वादात अडकलं आहे. मराठीचा मुद्दा उपस्थित स्थानिक मनसैनिकांनी ज्येष्ठ इंग्रजी लेखिका नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून विरोध केला. त्यानंतर साहित्य महामंडळाने नयनतारा सहगल यांना दिलेले निमंत्रण रद्द केलं. ह्या कारणामुळे अनेक साहित्यिकांनी या संमेलनावरच बहिष्कार घातला. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर श्रीपाद जोशी यांनी राजीनामा दिला आहे.








