कल्याण – गेल्या महिन्यापूर्वी कल्याण डोंबिवली पालिकेच्या महासभेत भाजपच्या एका नगरसेवकाने माहिती अधिकार कार्यकर्त्यांना ‘ब्लॅकमेलर’ शब्द वापरून हे कार्यकर्ते पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना ब्लॅकमेल करत असतात, असे भाष्य केले होते.
यासर्व प्रकरणात कल्याण डोंबिवली पालिकेत सक्रिय असलेल्या माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या कार्यपध्दती वर भाजपच्या डोंबिवलीतील एका नगरसेवकाने प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने कल्याणमधील ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते गणेश ताटे यांनी संबंधित भाजप नगरसेवकाला ज्येष्ठ वकील नितीन खंडाळकर यांच्यातर्फे कायदेशीर नोटीस बजावून येत्या ३० दिवस आपण केलेले आरोप सबळ पुराव्यानिशी सिध्द आणि स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. अन्यथा माहिती अधिकार कार्यकर्त्यांची बदनामी केली म्हणून फौजदारी आणि दिवाणी स्वरुपाची कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
कल्याण डोंबिवली पालिकेत १० ते १५ माहिती अधिकार कार्यकर्ते पालिका प्रशासनातील विविध प्रकारची प्रकरणे बाहेर काढून धसास लावण्याचा, याप्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होण्यासाठी प्रयत्नशील असतात. यामध्ये ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते गणेश ताटे हेही अशी प्रकरणे बाहेर काढून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबन, कठोर शिक्षा होतील यासाठी प्रयत्नशील असतात.
माहिती अधिकार कार्यकर्त्यांना ब्लॅकमेलर संबोधल्याने डोंबिवलीतील भाजप नगरसेवकाला कायदेशीर नोटीस देण्यात आली आहे.









