मुलुंड : वाहनचोरी प्रकरणात एका सराईत आरोपीला पोलिसांकडून अटक, ३.४५ लाखांची सहा वाहने जप्त..

159

मुंबई : मोटारसायकल चोरीच्या प्रकरणाचा एका सराईत आरोपीला अटक करण्यात मुलुंड पोलिसांना यश मिळाले आहे . पोलिसांनी वाहनचोरीची चार प्रकरणे उघडकीस आणली आहेत. आरोपीकडून सुमारे ३.४५ लाख रुपये किमतीची सहा चोरीची वाहने जप्त करण्यात आली आहेत.

या प्रकरणी संदीप नारायण वंजारी (२९), रा. राहुल नगर, मुलुंड कॉलनी, मुलुंड पश्चिम, याला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याचा इतर वाहनचोरीच्या गुन्ह्यांमध्येही सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आल्याचे सांगण्यात आले. पुढील तपासात सुमारे ३.४५ लाख रुपये किमतीची सहा वाहने जप्त करण्यात आली असून, वाहनचोरीची चार प्रकरणे उघडकीस आली आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, वंजारी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. चोरी, बेकायदा शस्त्र बाळगणे आणि दरोड्याच्या तयारीसह विविध स्वरूपाचे सात गुन्हे त्याच्याविरुद्ध यापूर्वी नोंदवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

ही कारवाई मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त मनोज शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त धनंजय कुलकर्णी, पोलीस उपायुक्त अभय सिंह देशमुख आणि सहायक पोलीस आयुक्त सुदर्शन होनवडजकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक निलेश धोंडे आणि मुलुंड पोलीस ठाण्यातील पथकाने ही कारवाई केली.