अग्रलेख: जिभेचा घसरलेला ताबा की सामाजिक विषवल्ली?

197

नांदेड येथील अनुसूचित जाती (SC) आरक्षण वर्गीकरण समर्थन मोर्चामध्ये माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन केलेले वादग्रस्त वक्तव्य केवळ निंदनीय नसून, महाराष्ट्राच्या पुरोगामी आणि वैचारिक परंपरेला गालबोट लावणारे आहे. सार्वजनिक मंचावरून बोलताना पदाची, वयाची आणि सामाजिक संदर्भांची सभ्यता राखणे हे कोणत्याही जबाबदार नेत्याचे मूलभूत कर्तव्य असते. मात्र, अत्यंत विकृत आणि महिलांचा अनादर करणाऱ्या भाषेचा वापर करून ढोबळे यांनी आपली बौद्धिक पातळीच दाखवून दिली आहे.

अधिक क्लेशदायक बाब म्हणजे, जेव्हा हे आक्षेपार्ह आणि जातीय विद्वेष पसरवणारे वक्तव्य केले जात होते, तेव्हा समोर बसलेल्या समुदायातील काहींकडून टाळ्या आणि शिट्या वाजवून त्याला समर्थन दिले जात होते. एखाद्या ज्येष्ठ नेत्याने व्यासपीठावरून समाजविघातक, स्त्री-विरोधी आणि चिथावणीखोर भाषा वापरावी आणि उपस्थित समुदायाने त्याला आंधळेपणाने दाद द्यावी, ही वृत्ती सामाजिक नैतिकतेच्या अधोगतीचे लक्षण आहे.

आरक्षण वर्गीकरणाची लढाई किंवा उपवर्गीकरणाचा मुद्दा हा वैचारिक, कायदेशीर आणि धोरणात्मक पातळीवर लढायचा विषय आहे. हक्क आणि अधिकारांची मागणी करताना एका घटकाने दुसऱ्या घटकावर चिखलफेक करणे किंवा अशा प्रकारची विखारी भाषा वापरणे हे सामाजिक ऐक्यासाठी अत्यंत धोकादायक आहे. सतत द्वेषपूर्ण वक्तव्ये करणाऱ्या आणि अपशब्दांचा वापर करणाऱ्या नेत्यांमुळे आज समाजात परस्पर अविश्वास आणि तणावाची परिस्थिती निर्माण होत आहे. या अशा विखारी भाषेमुळे समाजात पडणारी फूट रोखणे हे सर्वांचेच कर्तव्य आहे.

महाराष्ट्र हा शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा राज्य मानला जातो. येथे विचारसरणीतील भिन्नता किंवा मागण्यांमधील मतभेद असू शकतात; परंतु संवादाची पातळी इतक्या खालच्या थराला जाणे कदापि स्वीकारार्ह नाही. राजकीय किंवा सामाजिक मंचांचा वापर द्वेष पसरवण्यासाठी करणाऱ्या प्रवृत्तींचा सर्वच स्तरांतून तीव्र शब्दांत निषेध व्हायला हवा.

लक्ष्मण ढोबळे यांनी आपल्या या बेजबाबदार वक्तव्याबद्दल सार्वजनिक माफी मागितली पाहिजे. तसेच, भाषिक पातळी घसरवून समाजात तणाव निर्माण करणाऱ्या अशा प्रवृत्तींवर कायदेशीर आणि प्रशासकीय चौकटीतून योग्य ती कारवाई होणे काळाची गरज आहे, जेणेकरून भविष्यात कोणत्याही नेत्याला सार्वजनिक व्यासपीठाचा असा गैरवापर करण्याचे धाडस होणार नाही.

संपादक : प्रफुल गोरख कांबळे 

Email: Yuvaprabhav@gmail. com