मुंबई पोलिसांवर कारवाईचा बडगा..

45

मुंबई : मुंबई पोलीस दलातील शिस्तभंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. वेतन घोटाळा, कर्तव्यातील निष्काळजीपणा, गैरवर्तन आणि आर्थिक अनियमितता अशा प्रकरणांत कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कठोर भूमिका घेत सात महिन्यात 12पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित तर तीन जणांना सेवेतून थेट बडतर्फ करण्यात आले आहे.

मुंबई पोलिसांच्या वेतन घोटाळा प्रकरणात दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून, या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे आहे. सेवार्थ प्रणालीतील डिजिटल नोंदी, लॉगिन, वेतन मंजुरीची प्रक्रिया आणि संबंधित बँक खात्यांची तपासणी करण्यात येत आहे. या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे.

अमली पदार्थविरोधी कारवाईशी संबंधित एका प्रकरणात तरुण आंदोलकांना एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्ह्यात अडकवण्याची कथित धमकी दिल्याचा आरोप असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात आलीय. त्याची तात्काळ बदली देखील करण्यात आली होती.

याआधी बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात सुरक्षा व्यवस्थेतील निष्काळजीपणाबद्दल पोलीस शिपाई श्याम सोनावणे यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते तसेच दीर्घकाळ विनापरवानगी गैरहजर राहिलेल्या काही कर्मचाऱ्यांवर निलंबन आणि बडतर्फीची कारवाई करण्यात आलीय. आर्थिक अनियमिततेच्या आरोपांवर दोन प्रशासकीय अधिकाऱ्यांचेही निलंबन करण्यात आले आहे.

मुंबई पोलीस दलात शिस्त, पारदर्शकता आणि जबाबदारी कायम ठेवण्यासाठी अशाप्रकरणांमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विभागीय चौकशीतदोषी आढळणाऱ्यांवर आवश्यकतेनुसार कठोर प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाई केली जात आहे.