#NamakSattyagrah : “मुंबई विकू देणार नाही; मिठागरे वाचली तरच मुंबई वाचेल!”; काँग्रेस आक्रमक.

64

मुंबई: ९ ऑगस्ट क्रांती दिनी ज्याप्रमाणे देशाने इंग्रजांविरोधात लढा उभारला होता, त्याच धर्तीवर आज मुंबई विकू पाहणाऱ्या भांडवलदारांविरोधात आणि सत्ताधाऱ्यांविरोधात लढा उभारण्याची वेळ आली आहे. मुलुंडची मिठागराची जमीन ही केवळ जमिनीचा तुकडा नसून ती मुंबईसाठी नैसर्गिक पूरप्रतिबंधक कवच आहे. धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली ही जमीन अदानींच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू असून, काँग्रेस या अन्यायाविरोधात शेवटपर्यंत लढत राहील,” असा घणाघाती इशारा मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी दिला आहे.

९ ऑगस्ट या ऐतिहासिक क्रांती दिनाचे औचित्य साधून मुलुंड (पूर्व) येथील मिठागरावर आयोजित करण्यात आलेल्या ‘नमक सत्याग्रह’ (#NamakSatyagraha) आंदोलनाला पाठिंबा दर्शवत काँग्रेसने सत्ताधारी आणि उद्योगपतींवर सडकून टीका केली. या नमक सत्याग्रहाचे आयोजन काँग्रेस प्रवक्ते राकेश शेट्टी यांनी केले होते.

मुलुंडमध्ये पाणी साचण्याचे मुख्य कारण मिठागरांवरील बांधकाम!

काँग्रेस नेत्यांनी मुंबईतील बदलत्या पर्यावरणावर आणि पाण्याच्या निचऱ्याच्या समस्येवर बोट ठेवले:

नैसर्गिक कवच धोक्यात: मुलुंड ते कांजुरमार्ग दरम्यान पसरलेली २५६ एकर मिठागरांची जमीन आणि मंग्रोव्हस (कांदळवन) कापून तिथे भराव घातला जात आहे. यामुळे मुंबई शहराला मोठ्या संकटात लोटले जात आहे.

पाणी साचण्याचे कारण: यंदाच्या पावसाळ्यात मुलुंडमध्ये जे पाणी साचले, त्याला मिठागराच्या जमिनीवर सुरू असलेले अनधिकृत आणि बेकायदेशीर बांधकामच जबाबदार आहे, असा थेट आरोप करण्यात आला.

खासदार खरेदी करायला वेळ आहे, पण जनतेचे प्रश्न सोडवायला वेळ नाही!”

सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त करत वर्षा गायकवाड यांनी नमूद केले की, “आजच्या सत्ताधाऱ्यांना आमदार-खासदार खरेदी करायला आणि राजकारण करायला वेळ आहे; मात्र सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, समस्या आणि पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास समजून घ्यायला वेळ नाही. मुंबईत मिठागरांवर भराव घातला जात असताना आणि कांदळवनांची कत्तल होत असताना सत्ताधारी आमदार आणि लोकप्रतिनिधी गप्प का आहेत? ते समोर येऊन का बोलत नाहीत?” असा रोखठोक सवाल यावेळी वर्षा गायकवाड यांनी यावेळी विचारला आहे.

मुलुंडकरांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन

मुंबईचे भविष्य कोणाच्याही वैयक्तिक स्वार्थासाठी आणि भांडवलदारांच्या फायद्यासाठी विकू देणार नाही, असा निर्धार व्यक्त करत काँग्रेसने मुलुंड आणि मुंबईतील सर्व नागरिकांना या लढ्यात पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले आहे. “मिठागरे वाचली तरच मुंबई वाचेल, त्यामुळे या अन्यायाविरोधात क्रांती दिनाच्या दिवशी एकत्र येऊन लढा देणे ही काळाची गरज आहे,” असे आवाहन वर्षा गायकवाड यांनी केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, युवा प्रभाव न्यूज