मुंबई हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, अश्लिल व्हिडीओ काढून ब्लॅकमेलिंग..

137

मुंबई : १४ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. कांदिवली पूर्व येथील समतानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा संतापजनक प्रकार घडला आहे.

मैत्रीच्या जाळ्यात ओढून मुलीला एका खोलीत नेण्यात आले आणि तेथे तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या घटनेनंतर पीडित मुलीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला धमकावण्यात आल्याचेही समोर आले आहे. दरम्यान, आरोपींच्या मोबाईल फोनमध्ये २० हून अधिक अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ आढळल्याचा दावा करण्यात येत असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे.

समतानगर पोलिस ठाण्यात ११ नोव्हेंबर २०२६ रोजी दाखल झालेल्या एफआयआरमधील तक्रारीनुसार, पीडित मुलीची ऑगस्ट २०२६ मध्ये एका तरुणाशी ओळख झाली होती. त्यानंतर तिची आयान आणि कासिम यांच्याशीही ओळख वाढली. हळूहळू आरोपींशी तिचा संपर्क वाढत गेला. तक्रारीनुसार, ६ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी एका परिचित मुलीला भेटण्यासाठी जात होती. त्यावेळी तिची आरोपींशी भेट झाली. आरोपींनी तिला बहाण्याने कांदिवली पूर्वेतील हनुमान नगर परिसरातील एका खोलीत नेल्याचा आरोप आहे. तिथे तिच्यावर जबरदस्ती करून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. यावेळी तिचे अश्लील व्हिडीओ तयार करण्यात आल्याचाही आरोप आहे.

या घटनेनंतर १० नोव्हेंबर रोजी सोहेल नावाच्या आरोपीने पीडित मुलीला सोशल मीडियावर मेसेज पाठवून भेटण्यासाठी बोलावले. मात्र, मुलीने भेटण्यास नकार दिल्यानंतर तिचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या धमकीमुळे घाबरलेल्या मुलीने अखेर आपल्या आईला संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी समतानगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

या प्रकरणात आरोपींच्या मोबाईल फोनच्या तपासादरम्यान २० हून अधिक अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ आढळल्याचा दावा समोर आला आहे. त्यामुळे हे व्हिडिओ कोणाचे आहेत, त्यांचे चित्रीकरण कोणी केले आणि त्यांचा वापर मुलींना धमकावण्यासाठी करण्यात आला होता का? याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे. या व्हिडिओंच्या अनुषंगाने आणखी पीडित मुली आहेत का? याचाही तपास होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी एफआयआरमध्ये कृष्णा, कासिम, सोहेल आणि आयान या चौघांची नावे नमूद करण्यात आली आहेत. समतानगर पोलिसांनी ११ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.