दिग्रस (प्रतिनिधी): जातद्वेषातून शेताचा रस्ता अडवून एका दलित शेतकऱ्याची तब्बल ४ एकर जमीन पेरू न दिल्याची अत्यंत संतापजनक आणि गंभीर घटना दिग्रस तालुक्यातील सावंगा बु. लगतच्या लिंबा येथे समोर आली आहे. “महाराचा पाय माझ्या जमिनीला लागता कामा नये,” असे अतिशय जातीयवादी उद्गार काढत गेटला कुलूप ठोकून हक्काचा शेतरस्ता बंद करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप बाधित शेतकरी सुखदेव पांडुरंग लोखंडे यांनी केला आहे.
याप्रकरणी शेतकरी चळवळीचे प्रा. पंढरी पाठे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देऊन तसेच दिग्रसचे तहसीलदार मयूर राऊत यांच्याशी संपर्क साधून रस्ता तात्काळ मोकळा करण्याची आक्रमक मागणी केली होती. मात्र, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आणि दुर्लक्षामुळे हा प्रश्न अधिकच चिघळल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.
खरीप हंगाम वाया; अनाथ नातवंडांच्या पोटापाण्याचा प्रश्न
प्रत्यक्ष पाहणीदरम्यान बाधित शेतकरी सुखदेवराव लोखंडे अत्यंत भावूक झाले होते. आपल्या पाठीशी अनाथ नातवंडे असून, वेळेवर पेरणी न करता आल्यामुळे यंदाचा संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे आता कुटुंबाच्या आणि नातवंडांच्या पोटापाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याची करुण व्यथा त्यांनी मांडली.
पाहणीतील महत्त्वाचे मुद्दे आणि प्रमुख मागण्या:
दोन दिवसांत रस्त्याची मागणी: पालकमंत्री संजय राठोड, खासदार संजय देशमुख आणि तहसीलदार मयूर राऊत यांनी या प्रकरणात तातडीने वैयक्तिक हस्तक्षेप करून पुढील दोन दिवसांत शेतकर्याचा हक्काचा रस्ता मोकळा करून द्यावा.
नुकसानभरपाईची मागणी: पेरणी न झाल्याने झालेल्या मोठ्या आर्थिक नुकसानीची तात्काळ भरपाई देण्यात यावी, तसेच येणाऱ्या रब्बी हंगामासाठी आवश्यक असणारी शेती संसाधने उपलब्ध करून देण्यात यावीत.
ग्रामस्थांचा तीव्र आक्रोश: पाहणीवेळी ५० हून अधिक गावकऱ्यांनी उपस्थित राहून प्रशासकीय दिरंगाईबद्दल आणि जातीयवादी वृत्तीबद्दल तीव्र असंतोष व्यक्त केला.
गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती
या पाहणीच्या प्रसंगी शेतकरी चळवळीचे कृष्णा पुसनाके, सचिन मनवर यांच्यासह मारुती शिंदे, महादेव भुजाडे, अनिकेत शिंदे, उमेश शिरसाट, विलास बावणे, सुदीप जाधव, अरविंद जाधव, योगेश साखरे, ज्ञानेश्वर वाघमारे, सुनील जाधव, अमर शिंदे, अतुल शिरसाट, बंटी शिरसाट, वसंता शिंदे, हर्षल लडके, गोलू जाधव, आकाश साखरे यांच्यासह परिसरातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशासनाने या जातीयवादी प्रवृत्तीवर कडक कायदेशीर कारवाई करून सुखदेवराव लोखंडे यांना न्याय मिळवून द्यावा, अशी एकमुखी मागणी संपूर्ण परिसरातून केली जात आहे.








