मुलुंड/मुंबई: मुंबईतील करदात्या नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यास बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अपयशी ठरत असल्याचे आणखी एक जिवंत उदाहरण मुलुंडमध्ये समोर आले आहे. मुलुंड पूर्व येथील अत्यंत वर्दळीच्या एल. टी. रोड (L T Road) परिसरातील फूटपाथवर अनधिकृत फेरीवाले आणि दुकानदारांनी पूर्णपणे ताबा मिळवला असून, यामुळे करदात्या नागरिकांना चालण्यासाठी जागाच उरलेली नाही. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे स्थानिक पादचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.
संपूर्ण फूटपाथवर फळविक्रेते आणि इतर बेकायदेशीर स्टॉल्स थाटण्यात आले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना आपला जीव मुठीत धरून थेट मुख्य रस्त्यावरून चालावे लागत आहे. त्याच वेळी रस्त्यावरून बस, रिक्षा आणि दुचाकी वाहने वेगाने धावत असल्याने येथे केव्हाही मोठा अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
करदात्यांच्या पैशांचा अपमान; फूटपाथ मोकळे कधी होणार?
“आम्ही प्रामाणिकपणे पालिकेला कर (Tax) कशासाठी भरायचा? रस्त्यावरून चालताना अपघात होऊन जीव गमावण्यासाठी का?” असा संतप्त सवाल आता मुलुंडमधील सजग नागरिकांकडून विचारला जात आहे. पालिका प्रशासनाने तात्काळ या रस्त्यावरील अतिक्रमण हटवून फूटपाथ केवळ आणि केवळ पादचाऱ्यांसाठीच मोकळे करून द्यावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
अपघात झाल्यास बीएमसी भरपाई देणार का?
पालिकेच्या ढिम्म आणि बेजबाबदार कारभारामुळे जर मुख्य रस्त्यावरून चालताना एखाद्या पादचाऱ्याचा अपघात झाला, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी बीएमसी घेणार का? प्रशासकीय दिरंगाईमुळे होणाऱ्या अपघातांसाठी पालिका पीडित नागरिकांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक भरपाई देणार का?
“आता तरी जागे व्हा!” – नागरिकांची आर्त हाक
पावसाळा तोंडावर आलेला असताना रस्त्यांवरील ही गर्दी आणि पाण्याचे साम्राज्य यामुळे परिस्थिती आणखी बिकट होणार आहे. त्यामुळे मुलुंडमधील नागरिकांनी “प्लीज, आता तरी झोपेतून जागे व्हा!” अशी आर्त हाक बीएमसीच्या टी-वॉर्ड (T-Ward) प्रशासनाला मारली आहे. आता तरी पालिका प्रशासन या एल. टी. रोडवरील अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई करून करदात्या मुंबईकरांना न्याय देणार का? की एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









