अग्रलेख: पोलिसांची खाकी, सत्तेची चाकरी आणि पेटून उठलेली तरुण पिढी!

10

नीट’ (NEET-UG 2026) परीक्षा घोटाळा आणि पेपरफुटीमुळे आयुष्याचा खेळखंडोबा झालेल्या या देशातील तरुणाईचा आक्रोश आता केवळ दिल्लीच्या जंतर-मंतरपुरता मर्यादित राहिलेला नाही. आपल्या उज्वल भविष्यासाठी आणि अन्यायाविरुद्ध शांततेच्या मार्गाने दाद मागण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या निष्पाप विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांनी ज्या निर्दयतेने लाठ्या चालवल्या, त्याचेच अनुकरण आता मुंबई पोलिसांनीही करायला सुरुवात केली आहे. मुंबईत आपल्या न्याय्य हक्कांसाठी एकत्र आलेल्या विद्यार्थी आणि तरुणांवर पोलिसांनी अवलंबलेले दमनशाहीचे धोरण हे महाराष्ट्राच्या आणि लोकशाहीच्या परंपरेला काळिमा फासणारे आहे.

सत्तेत बसलेल्यांचे मन राखण्यासाठी आणि त्यांचे पद वाचवण्यासाठी पोलिसांनी सर्व मर्यादा ओलांडल्याचे विदारक दृश्य सध्या मुंबईत पाहायला मिळत आहे. आंदोलक तरुणांना धाक दाखवण्यासाठी “खिशात ५० ग्रॅम ड्रग्जची पुडी टाकून अमली पदार्थ प्रकरणात आयुष्यभरासाठी तुरुंगात डांबून टाकू,” अशी उघडउघड धमकी देणारे पोलीस अधिकारी जेव्हा रस्त्यावर दिसतात, तेव्हा या देशात कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य उरले आहे की पोलिसांची गुंडगिरी सुरू आहे, असा संतप्त सवाल निर्माण होतो. याहूनही भयानक आणि संतापजनक बाब म्हणजे, आंदोलनात सहभागी झालेल्या निष्पाप तरुणींना हाताळताना पोलिसांकडून त्यांच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करणे आणि अश्लील वर्तन करण्यासारखे अत्यंत लाजीरवाणे प्रकार घडत आहेत. पोलीस आपले घटनादत्त कर्तव्य पूर्णपणे विसरत चालले आहेत का? सत्तेच्या गल्लीबोळात बसलेल्या आकांचे उंबरठे घासणे आणि त्यांची गुलामी करण्यातच आता खाकी वर्दी धन्यता मानू लागली आहे का?

परंतु, दडपशाहीचा अतिरेक झाला की प्रतिकाराची धग अधिक तीव्र होते, हा इतिहासाचा नियम आहे. मुंबईत पोलिसांच्या व्हॅनसमोर निडरपणे उभी राहून गाडी अडवणारी ‘ती’ तरुण मुलगी या व्यवस्थेला स्पष्ट संदेश देत आहे—”आता ना आम्ही तुमच्या जुलमी सरकारला घाबरतो, ना तुमच्या पोलिसांच्या लाठ्यांना!” अन्याय सहन करण्याच्या मर्यादा संपल्या की, तरुण पिढी थेट इथल्या प्रस्थापित आणि गंजलेल्या व्यवस्थेला भिडायला तयार होते, याचेच हे जिवंत उदाहरण आहे. भीतीची भिंत आता गळून पडली आहे.

याच पोलिसांच्या निर्दयी आणि असंवेदनशील वर्तमानात एक दिलासादायक आणि आशेचा किरणही पाहायला मिळाला. सर्वच पोलीस आपली संवेदनशीलता गमावून बसलेले नाहीत. एका ठिकाणी ताब्यात घेऊन आणलेल्या भुकेल्या आणि थकलेल्या आंदोलक विद्यार्थ्यांना माणुसकीच्या नात्याने स्वतःच्या खिशातून ‘वडापाव’ खाऊ घालणारे संवेदनशील पोलीस अधिकारीही याच मुंबईत दिसले. हीच महाराष्ट्राच्या खाकीची खरी ओळख आहे. पोलिसांचे हेच रूप दाखवून देते की, वर्दीच्या आतही एक मानवी हृदय धडधडत असते, जे सत्तेच्या आदेशापेक्षा माणसाच्या भावनेला जास्त ओळखते.

मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच प्रशासनाचे कान उपटताना अत्यंत मार्मिक शब्दांत बजावले होते की, “शासकीय यंत्रणा आणि पोलीस हे जनतेचे सेवक आहेत, ते केवळ सर्वोच्च नेत्यांची चाकरी करण्यासाठी नाहीत.” खाकी परिधान करणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याने न्यायालयाच्या या ताशेऱ्यांचे स्मरण ठेवण्याची गरज आहे. राज्यकर्ते येत राहतील आणि जात राहतील, पण जनतेचा विश्वास गमावलेली पोलीस यंत्रणा लोकशाहीला घातक ठरेल. पोलिसांनी सत्तेची चाकरी सोडून घटनेचे आणि नागरिकांचे रक्षण करण्याचे आपले मूलभूत कर्तव्य बजावावे; अन्यथा रस्त्यावर उतरलेला हा पेटलेला जनसागर या निद्रिस्त आणि अहंकारी व्यवस्थेची खुर्ची उलथवून टाकल्याशिवाय राहणार नाही!

प्रफुल गोरख कांबळे 

www.YuvaPrabhav.Com

– संपादक, युवा प्रभाव न्यूज

ईमेल : yuvaprabhav@gmail.com