NEET परीक्षा घोटाळ्यावरून राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा; तरुणांना केले ‘हे’ आवाहन

78

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे  NEET 2024 परीक्षेतील कथित अनियमिततेच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टीका केली आहे. देशातील तरुणांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना सरकारकडून संरक्षण दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

गुगल करून पहा’ – राहुल गांधींचे तरुणांना आव्हान. 

राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये देशातील तरुणांना एक उपदेशात्मक आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “देशातील तरुणांसमोर मला एक गंभीर गोष्ट मांडायची आहे. तुम्ही स्वतः गुगल करून पहा की, NEET 2024 च्या मोठ्या घोटाळ्यादरम्यान NTA (National Testing Agency) चे महासंचालक (DG) कोण होते आणि मोदी सरकारने आज त्यांना कुठे बसवले आहे?”

या पोस्टच्या माध्यमातून गांधी यांनी भाजप सरकारवर भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असल्याचा आरोप केला आहे लाखो कष्टाळू विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना भाजप ‘इनाम’ देते, त्यांचे रक्षण करते आणि त्यांना बढती देते, असा दावा त्यांनी केला.

पंतप्रधान मोदीजी आणि भाजप तुमच्या भविष्याच्या चोरीमध्ये स्वतः भागीदार आहेत, असे थेट विधान राहुल गांधी यांनी केले आहे. ज्या बाजारपेठेत विद्यार्थ्यांचे कष्ट आणि स्वप्ने विकली जात आहेत, तिथे ‘जितकी मोठी चोरी, तितके मोठे बक्षीस’ हा एकच नियम लागू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राहुल गांधींची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, यामुळे पेपर फुटी आणि परीक्षां मधील गोंधळाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे.