मुख्यमंत्री विजयचा धडाकेबाज निर्णय, ७१७ दारूची दुकाने बंद करण्याचे दिले निर्देश..

79

मुख्यमंत्री पदावर विराजमान होताच सी. जोसेफ विजय यांनी तमिळनाडूमध्ये अनेक धडाकेबाज निर्णय घेतले आहेत.. येत्या दोन आठवड्यांत राज्यभरातील प्रार्थनास्थळे, शैक्षणिक संस्था आणि बस स्थानकांच्या ५०० मीटरच्या परिसरात असलेली तामिळनाडू राज्य विपणन महामंडळाद्वारे (TASMAC) चालवण्यात येणारी ७१७ दारुची दुकाने बंद करण्याचे निर्देश मुख्यमंत्री विजय यांनी दिले आहेत.

सरकारद्वारे तमिळनाडूभर ४ हजार ७६५ दारुची दुकाने चालवली जातात.

मुख्यमंत्र्‍यांच्या निर्देशानुसार अधिकाऱ्यांनी मंदिरे, शाळा, महाविद्यालये आणि बस स्थानकांजवळ कार्यरत असलेली दुकाने ओळखण्यासाठी राज्यव्यापी पाहणी केली. सर्वेक्षणात असं आढळून आलंय की २७६ दारुची दुकाने प्रार्थनास्थळांजवळ १८६ शैक्षणिक संस्थांजवळ आणि २५५ बस स्थानकांजवळ आहेत, त्यामुळे बंद करण्यासाठी निश्चित केलेल्या दुकानांची एकूण संख्या ७१७ झाली आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दारूच्या दुकानांवर अधिक कठोर नियमन सुनिश्चित करणे आणि संवेदनशील सार्वजनिक ठिकाणांजवळ असलेल्या राज्य सरकारच्या दुकानांविषयीच्या सार्वजनिक चिंता दूर करणे, हा या निर्णयाचा उद्देश आहे.

निष्कर्षांच्या आधारे, मुख्यमंत्री विजय यांनी अधिकाऱ्यांना दोन आठवड्यांच्या आत सर्व ७१७ दुकाने बंद करण्याचे निर्देश दिले. TASMAC ची दुकाने तमिळनाडू सरकारसाठी महसुलाचा प्रमुख स्रोत राहिली आहेत, तरीही गेल्या काही वर्षांपासून राजकीय पक्षांकडून अनेक दारूची दुकाने बंद करण्याची मागणी केली जात आहे.

जोसेफ विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघमनेही आपल्या जाहीरनाम्यात अंमली पदार्थमुक्त तमिळनाडूसाठी काम करण्याचे वचन दिले होते.