५७ तोळे सोने घालणाऱ्या “गोल्डमॅन”ला मित्रानेच लुटले, खारघर येथील धक्कादायक घटना…

126

पनवेल : मित्रानेच मित्राला लुटण्याची घटना खारघर येथे घडली आहे. अंगावर तब्बल ५७ तोळे सोन्याचे दागिने परिधान करणाऱ्या खारघरमधील ‘गोल्डनमॅन’ चा विश्वासघात त्याच्या मित्रानेच केला. जिवलग मित्राने पत्नी, मेव्हणा आणि इतर साथीदारांच्या मदतीने सशस्त्र दरोडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणी खारघर पोलिसांनी सात जणांना अटक करून सोन्याचे दागिने, कार, दुचाकी, चाकू आणि बनावट पिस्तूल असा मुद्देमाल जप्त केला आहे.

खारघर येथील सुशांत मोरे (वय ३७) हे अंगावर नेहमी मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने परिधान करत असल्याने परिसरात ‘गोल्डनमॅन’ म्हणून ओळखले जातात. २२ एप्रिल रोजी ते मित्रांसोबत बेलापूर येथे जेवण करून घरी परतत असताना त्यांच्या गाडी चालकाच्या हातातील ५७ तोळे सोन्याचे दागिने असलेली पिशवी तिघांनी चाकूचा धाक दाखवत हिसकावून नेली. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता मोरे यांचा मित्र अभिनंदन तानाजी माळी याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला. मात्र, “माझ्या मित्रांवर पूर्ण विश्वास आहे,” असे सांगत मोरे यांनी त्याची बाजू घेतली. तरीही पोलिसांनी तपास सुरू ठेवला आणि अखेर अभिनंदन माळी यानेच गेल्या वर्षभरात विश्वास संपादन करून लुटीचा कट रचल्याचे उघड झाले. या कटात त्याची पत्नी कोमल माळी, मेव्हणा वैभव माळी तसेच इतर साथीदारांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.

मुख्य आरोपी राहुल माळी आणि हर्षद सागरे हे पोलिसांना चकवा देण्यासाठी सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर आणि तेलंगणातील बाळूमामांच्या पालख्यांबरोबर फिरत होते.

अखेर त्यांना ७ मे रोजी अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत मोहीते यांनी दिली. हा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जोशी, राजेंद्र कोते, अशोक ढमाळे, सूरज पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद बरकडे, गणेश दळवी, निलेश येवले, नितिन शिंदे व इतर खारघर पोलिसांनी ही उल्लेखनीय कारवाई केली.