मुंबई : गोवंडी येथील एका नामांकित शाळेत काम करणाऱ्या ४५ वर्षीय शिपायाने ६ वर्षीय विद्यार्थ्यासोबत असभ्य वर्तन केल्याची बातमी समोर आल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित शिपायाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तसेच लहान मुलांच्या सुरक्षेतेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे नाव राजेश महाकाळ असून संबंधित शाळेत शिपाई म्हणून कार्यरत होता. मागील वर्षभरापासून तो विद्यार्थ्यासोबत गैरवर्तन करत असल्याचा आरोप करण्यात येत होते. शाळेतील रिकाम्या खोलीत नेऊन आरोपी विद्यार्थ्यासोबत अयोग्य कृत्य करत असल्याचे तपासात समोर येत आहे. दरम्यान, पीडित विद्यार्थ्याने अखेर हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला. मुलाकडून घडलेला प्रकार ऐकताच पालकांना मोठा धक्का बसला. त्यांनी तातडीने गोवंडी पोलिस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी राजेश महाकाळ याच्याविरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.
या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी, बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) अंतर्गतही कारवाई केली असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या आरोपीची चौकशी सुरू असून, या प्रकरणात आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गोवंडी पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. शाळेतील इतर कर्मचारी, शिक्षक तसेच प्रशासनाचीही चौकशी केली जाणार आहे.
दरम्यान, बदलापूरमधील घटनेनंतर राज्यभरात शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नचिन्ह निर्माण केले जात असताना, गोवंडीतील ही घटना समोर आल्याने पालक वर्गासमोर संतापाचे आणि चिंतेचे वातावरण आहे. पालकांकडून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.









