डोंबिवली : सोबत खासगी सुरक्षा रक्षकांचा ताफा, काळ्या गणवेशातील बंदुकधारी घेऊन फिरणारा डोंबिवलीतील रहिवासी निखील मदन भोईर याला १८ लाख १९ हजार रूपयांच्या फसवणूक प्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे.
निखीलवर एकूण ६ गुन्हे दाखल आहेत. त्यामधील ४ गुन्हे हे फसवणुकीचे आहेत. पोलीस अनेक दिवसांपासून या भामट्याच्या मागावर होते. अखेर तो एका कर्जाऊ रकमेच्या फसवणूक प्रकरणात पोलिसांच्या तावडीत सापडला आहे.
मुलुंड येथे राहणारे बांधकाम व्यावसायिक देवानंद गंगाधर साळसकर (६४) यांच्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलिसांनी निखील मदन भोईर, त्याचा साथीदार राजा जोशी यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३(५) प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ६ एप्रिल २०२६ ते ९ एप्रिल २०२६ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, तक्रारदार बांधकाम व्यावसायिक देवानंद साळसकर यांना आपल्या बांधकाम व्यवसायाच्यानिमित्ताने कर्जाऊ रक्कम पाहिजे होती. त्यांचा संपर्क निखील मदन भोईर या भामट्या बरोबर आला. निखील खासगी सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात, बंदुकधारींच्या ताफ्याने फिरत असल्याने तो समाजातील मोठा वजनदार सावकार असल्याचा भास नागरिकांना होत होता. कर्जाऊ रक्कम मिळण्यासाठी बांधकाम व्यावसायिक साळसकर यांनी निखील भोईर, त्याचा साथीदार राजा जोशी यांच्याशी संपर्क केला. यावेळी निखील, राजा जोशी यांनी बांधकाम व्यावसायिक साळसकर यांना आम्ही तुम्हाला १५ कोटी रूपये खासगी सावकाराकडून कर्जाऊ रक्कम मिळून देतो असे आश्वासन दिले.
ही १५ कोटीची रक्कम मिळण्यासाठी आपणास तुम्हाला पहिले मुद्रांक शुल्क आणि दस्त नोंदणीकरणाचे शुल्क आगाऊ भरणा करावे लागेल असे निखील भोईर, राजा जोशी यांनी तक्रारदार साळसकर यांना सांगितले. हा कर्ज रकमेचा व्यवहार झटपट होण्यासाठी साळसकर यांनी या दोन्ही प्रक्रियांसाठी १३ लाख ५० हजार रूपये ऑनलाईन आणि रोख स्वरूपात निखील, राजा जोशी यांना दिले आणि त्यांच्या बँक खात्यात जमा केले. त्यानंतर साळसकर यांनी कर्ज मंजुरीच्या प्रक्रिया लवकर होण्यासाठी निखील, राजा यांच्या पाठीमागे तगादा लावला. ते वेळकाढूपणाची उत्तरे देऊन साळसकर यांना टाळू लागले. पैसे देऊन अनेक दिवस झाले तरी मुद्रांक शुल्क, दस्त नोंदणीकरणाची प्रक्रिया होत नाही. आणि कर्जाऊ रक्कम मिळत नसल्याने देवानंद साळसकर अस्वस्थ झाले.
त्यांनी निखील, राजा यांच्यामागे झटपट कर्जासाठी तगादा लावला. कर्ज प्रक्रिया होणार नसेल तर आपले १३ लाख परत देण्याची मागणी करू लागले. त्यानंतर दोघांनी साळसकर यांच्या संपर्काला प्रतिसाद देणे बंद केले. निखील, राजा यांनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर साळसकर यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
साळसकर यांच्याप्रमाणेच निखील भोईर याने शंकर श्रीरंगराव भिसे (६५) यांची व्यवसायाला कर्ज मिळून देतो असे सांगून ४ लाख रूपयांची फसवणूक, विनया जीवन सकपाळ यांचे पक्षकार आधारवाडी तुरूंगात आहेत. त्यांनी कामासाठी पैसे देण्यास सांगितले आहे असे सांगून विजया यांच्याकडून ६९ हजार रूपये उकळले आहेत. अशाप्रकारे निखील, राजा यांनी अनेक नागरिकांची १८ लाख १९ हजार रूपयांची फसवणूक केल्याने पोलिसांनी त्याच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.निखीलने अशाप्रकारे किती जणांची फसवणूक केली आहे याचा तपास गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक गहिनीनाथ गमे करत आहेत.









