मुंबई : आज झालेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोतवालांच्या मानधनात वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यास मान्यता, महाराष्ट्र राज्य कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाची (SMART) अंमलबजावणी,1416 रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेणे हे निर्णय देखील घेण्यात आले.
कोतवालांनी मानधनातील वाढीसाठी गेल्या महिन्यापासून कामबंद आंदोलन सुरू केले होते. दरमहा 2 हजार 500 रुपये वाढ करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज झालेल्या बैठकीत घेतला. आता कोतवालांना दरमहा साडे सात हजार रुपये इतके मानधन मिळणार आहे.
या निर्णयाबरोबरच नागपूर परिसरासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मेट्रो रेल प्रकल्प टप्पा-2 या उन्नत मेट्रो मार्गास मान्यता निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. तसेच राज्यातील विविध नगरपरिषदा-नगरपंचायतींमध्ये 11 मार्च 1993 ते 27 मार्च 2000 या कालावधीतील नियुक्त व कार्यरत 1416 रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याचा निर्णयास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.







