मुंबई: ज्येष्ठ साहित्यिक नयनतारा सहगल यांना यवतमाळ येथे आयोजित अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे पाठवलेले निमंत्रण रद्द करण्यात आले. आणि साहित्य विश्वात आयोजकांविरोधात राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या घटनेचा निषेध म्हणून संमेलनावरच बहिष्कार टाकण्याचा इशारा अनेक साहित्यिकांनी दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपल्या पक्षाचा विरोध नसल्याची भूमिका तातडीने जाहीर केली आहे.
इंग्रजी लेखिकेला मराठी संमेलनात बोलावल्याच्या मुद्द्यावरून मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नयनतारा यांच्या संमेलनातील उपस्थितीवर आक्षेप घेतला होता. त्यामुळे त्यामुळे संमेलनात गोंधळ नको म्हणून आयोजकांनी नयनतारा यांना पाठवलेले निमंत्रण परत घेत असल्याचे रविवारी जाहीर केले होते. मात्र २०१४ साली देशातील असहिष्णुतेविरोधात साहित्य अकादमीचा पुरस्कार परत करणाऱ्या नयनतारा यांच्या या संमेलनातील भाषणातही सरकारविरोधी टिप्पणी असल्यामुळेच त्यांचे निमंत्रण मागे घेण्यात आल्याची टीका सरकारवर चहू बाजूने होऊ लागली. राज्यातील बहुतांश साहित्यिकांनी नयनतारा यांच्या समर्थनार्थ संमेलनावरच बहिष्कार घालण्याचा इशारा देखील दिला आहे. अमोल पालेकर, तुषार गांधी, प्रज्ञा दया पवार, अच्युत गोडबोले, विद्या चव्हाण, विश्वास उटगी, स्मृती कोप्पीकर, किशोर कदम, इब्राहिम अफगाण, रा.रं. बोराडे, ऋषिकेश कांबळे यांच्यासह अनेक मान्यवरांचा त्यात समावेश अाहे.
नयनतारा यांना अामंत्रण नाकारणे ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी बाब असल्याची प्रतिक्रिया अनेक संघटना करत आहेत.








