मुंबई: मुलुंड पूर्व येथे शाळेच्या अगदी जवळ आणि खेळाच्या मैदानासाठी राखीव असलेल्या मोकळ्या भूखंडावर उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित पेट्रोल व सीएनजी पंपाविरोधात नागरिक आणि राजकीय सामाजिक संघटना आक्रमक झाल्या आहेत. याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांच्याकडे औपचारिक तक्रार अर्ज दाखल करण्यात आली असून, हा धोकादायक प्रकल्प तात्काळ रोखण्याची मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे (MRCC) सरचिटणीस आणि मुख्य प्रवक्ते राकेश शंकर शेट्टी यांनी पालिकेला दिलेल्या पत्राद्वारे ही अधिकृत तक्रार नोंदवली आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि पर्यावरणाचा प्रश्न
महापालिका आयुक्तांना पाठवलेल्या तक्रार अर्जात नमूद करण्यात आल्यानुसार:
- शाळेजवळ धोकादायक प्रकल्प: मुलुंड पूर्व येथील एका शाळेच्या लगतच पेट्रोल व सीएनजी पंप उभारणीचा प्रस्ताव आहे. यामुळे शाळाकरी मुले, पालक आणि स्थानिक रहिवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
- खेळाचे मैदान वाचवण्याची मागणी: ज्या जागेवर हा पंप प्रस्तावित आहे, तो भूखंड नागरिक आणि क्रीडाप्रेमींसाठी मोकळे मैदान व क्रीडा संकुल (Sports Complex) म्हणून संरक्षित राहणे गरजेचे आहे.
- सीपीसीबीच्या नियमांचे उल्लंघन: केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) नियमांनुसार, कोणत्याही नवीन पेट्रोल पंपाचे डिस्पेन्सिंग युनिट, फिल पॉईंट किंवा व्हेंट पाईप हे शाळेपासून किमान ५० मीटरच्या (Radial) अंतरावर असणे बंधनकारक आहे. कोणत्याही परिस्थितीत हे अंतर ३० मीटरपेक्षा कमी असू नये. मात्र, या प्रस्तावित पंपामुळे या सुरक्षा नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
ऑक्ट्रॉय नाका येथील १८ एकर भूखंडाचा पर्याय
पत्रात पुढे स्पष्ट करण्यात आले आहे की, मुलुंड पूर्वेतील नागरिकांसाठी पेट्रोल व सीएनजी पंपाची गरज नाकारता येत नाही; मात्र ही सुविधा सुरक्षित ठिकाणी स्थापन केली पाहिजे. मुलुंड पूर्व येथील ईस्टर्न एक्सप्रेस हायवे लगतच्या ऑक्ट्रॉय नाक्याजवळ (Octroi Naka) सुमारे १८ एकर मोकळी जागा उपलब्ध आहे. या जागेचा पर्यायी स्थान म्हणून विचार केल्यास मुलांच्या सुरक्षेचा प्रश्नही सुटेल आणि नागरिकांची गरजही पूर्ण होईल.
प्रस्तावित जागेवर पत्रकार परिषद आणि मोजणी
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन २५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता प्रस्तावित पेट्रोल पंपाच्या जागेवर एक विशेष पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी नागरिक आणि प्रसिद्धी माध्यमांच्या उपस्थितीत शाळा आणि प्रस्तावित पेट्रोल पंपामधील प्रत्यक्ष अंतराची मोजणी करण्यात आली. या पाहणीचा सविस्तर अहवाल राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
महापालिकेकडे प्रमुख मागण्या:
१. मुलुंड पूर्व येथील प्रस्तावित पेट्रोल पंपाच्या जागेचा तात्काळ पुनर्विचार करण्यात यावा.
२. प्रस्तावित जागा आणि शाळा यांतील अचूक अंतराची पालिका प्रशासनाने प्रत्यक्ष पडताळणी करावी.
३. CPCB, PESO (Explosives Dept) आणि इतर पर्यावरण नियमांच्या मंजुरींची सखोल चौकशी व्हावी.
४. ऑक्ट्रॉय नाक्याजवळील १८ एकर जागेचा पर्यायी जागा म्हणून विचार केला जावा.
५. क्रीडा संकुल आणि मोकळ्या मैदानाचे अस्तित्व कायम ठेवून मुलांचे आरोग्य सुरक्षित ठेवावे.
– ब्युरो रिपोर्ट, युवा प्रभाव न्यूज








