लग्नाच्या वरातीत घोड्यावर बसल्याने दलित वधूवर हल्ला, पुन्हा ८ दिवसांनंतर काढली भव्य लग्नाची मिरवणूक!

47

भारतात आजही जातीभेदाची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत. याचे एक धक्कादायक उदाहरण समोर आलें आहे. उदयपूरमध्ये एका दलित वधूची ‘बिंदोली’ (लग्नाची मिरवणूक) केवळ ती दलित असल्यामुळे अडवण्यात आली आणि तिला घोड्यावरून खाली उतरवण्यात आले.

मात्र, या अन्यायापुढे न झुकता, ८ दिवसांनंतर याच वधूची शेकडो लोकांच्या उपस्थितीत पुन्हा एकदा दिमाखात मिरवणूक काढून समतेचा संदेश देण्यात आला आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे.

मिळालेल्या वृत्तानुसार, २९ एप्रिल रोजी उदयपूरमधील हरियाव भागात पूजा मेघवाल या तरुणीची लग्नाची मिरवणूक निघाली होती. पूजा घोड्यावर स्वार होऊन जात असताना गावातील काही कुटुंबांतील व्यक्तींनी तिला अडवले. “दलित असूनही घोड्यावर कशी काय बसली?” असा जाब विचारत त्यांनी मिरवणुकीवर हल्ला केला. यावेळी मिरवणुकीत सहभागी असलेल्या महिला आणि लहान मुलांवर दगडफेक करण्यात आली. लाठ्या-काठ्या आणि तलवारींनी केलेल्या या हल्ल्यात अनेकजण जखमी झाले असून काहींचे दागिनेही चोरले गेल्याचा आरोप पूजाचे वडील भैरूलाल मेघवाल यांनी केला आहे.

या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली. ७ मे रोजी भीम आर्मी आणि इतर सामाजिक संघटनांच्या पुढाकाराने पूजाची पुन्हा एकदा ‘सांकेतिक बिंदोली’ काढण्यात आली. यावेळी चित्र पूर्णपणे वेगळे होते. पूजाने निळ्या रंगाचा सुंदर पोशाख परिधान केला होता आणि तिच्या हातात क्रांतिसूर्य जोतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा होती.

उदयपूरच्या टाऊन हॉलपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या मिरवणुकीत ‘जय भीम’च्या घोषणा आणि संविधानाने दिलेल्या हक्कांची जाणीव करून देणारे फलक घेऊन हजारो नागरिक सहभागी झाले होते.

पूजाचे वडील भावूक होत म्हणाले, “आम्हाला हे दाखवायचे होते की आम्हीसुद्धा तुमच्यासारखीच माणसे आहोत, भारताचे रहिवासी आहोत. स्वातंत्र्याला जवळपास ८० वर्षे झाली तरी काही लोकांची अस्पृश्यतेबद्दलची मानसिकता अजूनही कायम आहे.” असे पूजाचे वडील भैरूलाल मेघवाल यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’ला सांगितले.

भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष रोशन मेघवाल यांनी सवाल केला की, “जर सावित्रीबाईंमुळे महिलांना आज सर्व क्षेत्रांत समान हक्क मिळाले आहेत, तर मग एका दलित मुलीला घोड्यावर बसण्यापासून का रोखले जाते?”

या प्रकरणी पोलिसांनी लक्ष्मण सिंह, मधु सिंह यांच्यासह अनेक जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्याप सर्व आरोपींना अटक झालेली नाही. भीम आर्मीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागणी केली आहे की, सर्व दोषींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर ‘आर्म्स ॲक्ट’ अंतर्गत कारवाई करावी. मेघवाल समाजावर होणारा सामाजिक बहिष्कार आणि भेदभाव थांबवण्यासाठी कडक पावले उचलावीत. पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही जातिवादी मानसिकता मोडीत काढण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न करावेत.

या घटनेने राजस्थानमधील दलित समाजावरील वाढत्या हल्ल्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. पूजाने दिलेला हा लढा केवळ तिच्या सन्मानाचा नसून, समतेसाठी लढणाऱ्या प्रत्येक शोषिताचा आवाज ठरला आहे.