निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात २ ऑक्टोबर रोजी मुंबईतील शिवाजी पार्क येथे आंदोलन करण्याची घोषणा करणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. दरम्यान CJP संस्थापक अभिजित दीपक यांनी जेल भरो आंदोलनाची घोषणा केली आहे. आज CJP चे देशभरातील सर्व प्रमुख नेते मुंबईत दाखल झाले आहेत.
शिवाजी पार्कमधील सार्वजनिक सभा आणि आंदोलनांवरील न्यायालयीन निर्बंध, बीएमसीची आवश्यक परवानगी नसणे, वाहतूक कोंडी, ध्वनिप्रदूषण तसेच परिसरातील रुग्णालये आणि निवासी भागांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. परवानगी नाकारल्यानंतर CJPचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी २ ऑक्टोबरला ‘जेल भरो आंदोलन’ करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, मंगळवारी CJPचे काही पदाधिकारी आणि समन्वयक प्रस्तावित आंदोलनाच्या जागेची पाहणी करण्यासाठी शिवाजी पार्क परिसरात पोहोचले असता काही स्थानिक नागरिकांनी त्यांना विरोध केला. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद झाल्याचे वृत्त आहे.
CJPकडून विरोध करणाऱ्या एका व्यक्तीचा भाजपशी संबंध असल्याचा दावा करण्यात आला आहे. या दाव्याची स्वतंत्र पुष्टी झालेली नसून, संबंधित व्यक्तीने स्वतःची भूमिका शिवाजी पार्कवरील नियम आणि स्थानिक परिसराच्या हिताशी संबंधित असल्याचे सांगितल्याचे वृत्त आहे. या वादात मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही प्रतिक्रिया देत शिवाजी पार्कमध्ये राजकीय आंदोलनांच्या परवानगीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, शिवाजी पार्कसाठी बीएमसीची परवानगीही अद्याप मिळालेली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे २ ऑक्टोबरच्या आंदोलनाबाबत CJPची पुढील भूमिका आणि प्रशासनाची कारवाई याकडे आता लक्ष लागले आहे.








