पुणे : वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने महावितरणकडून राज्यभरात सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसवण्याच्या सक्तीविरोधात तसेच वीज ग्राहकांच्या हितसंरक्षणासाठी आज रास्ता पेठ, पुणे येथील महावितरण कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात वीज ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रकाराचा तीव्र निषेध करण्यात आला. वीज ग्राहकांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक असताना महावितरणचे कर्मचारी अनेक ठिकाणी नागरिकांना कोणतीही पूर्वसूचना न देता जुने मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहे.
महावितरणने स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती तात्काळ थांबवावी, अन्यथा आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल तसेच स्मार्ट मीटरची होळी करून व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने देण्यात आला.
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीच्या पुणे शहरातील सर्व विभागांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पर्वती विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








