मुंबई: अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या (Sub-categorization) निर्णयाविरोधात देशभरात असंतोष खदखदत असताना, आता महाराष्ट्राची राजधानी मुंबईत याविरोधात निर्णायक लढा पुकारण्यात आला आहे. ‘आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती‘च्या वतीने येत्या ३० जून रोजी मुंबईत एका भव्य ‘महामोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे. आज पार पडलेल्या संघर्ष समितीच्या एका अत्यंत महत्त्वपूर्ण नियोजन बैठकीत या आंदोलनाची अंतिम रूपरेषा आणि नियोजन निश्चित करण्यात आले.
या महामोर्चाच्या माध्यमातून आरक्षणाचे मूळ घटनात्मक स्वरूप टिकवून ठेवण्यासाठी आणि उपवर्गीकरणाच्या अन्यायकारक निर्णयाला विरोध करण्यासाठी राज्यभरातून लाखो नागरिक मुंबईत एकत्र येण्याची शक्यता आहे.
कसा असेल महामोर्चा? (संपूर्ण नियोजन):
मोर्चाचे नाव: महामोर्चा
दिनांक: मंगळवार, ३० जून
वेळ: दुपारी ठीक १२:०० वाजता
मोर्चाची सुरुवात: मेट्रो सिनेमा समोरून (मुंबई)
सभेचे मुख्य ठिकाण: बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मुख्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्टेशन समोर.
आंबेडकरी चळवळीतील दिग्गज नेत्यांची प्रमुख उपस्थिती:
या नियोजन बैठकीला आणि मुख्य महामोर्चाला मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्रातील बहुजन आणि आंबेडकरी चळवळीतील प्रमुख मान्यवर व राजकीय नेते एकाच मंचावर येणार आहेत. यामध्ये:
मा. भीमराव आंबेडकर (भारतीय बौद्ध महासभा)
मा. आनंदराज आंबेडकर साहेब (रिपब्लिकन सेना प्रमुख)
मा. ॲड. सुरेश माने साहेब ( बी आर एस पी प्रमुख)
मा. बबनराव घोलप साहेब (माजी मंत्री)
मा. राजकुमार बडोले साहेब (माजी मंत्री)
मा. बाबुराव माने साहेब (माजी आमदार)
मा. राहुल डंबाळे (अध्यक्ष, उपवर्गीकरण पुनर्विलोकन समिती)
मा. प्रतिक कांबळे
मा. संजय भालेराव यांच्यासह राज्यातील इतर सर्व प्रमुख मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
“आरक्षणाच्या संरक्षणासाठी एकत्र या!” – आयोजकांचे आवाहन
आरक्षण उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समितीच्या आयोजकांनी राज्यातील सर्व शोषित, वंचित आणि न्यायप्रिय नागरिकांना या ऐतिहासिक मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. “आरक्षणाच्या रक्षणासाठी आणि आपल्या घटनात्मक हक्कांचा आवाज बुलंद करण्यासाठी प्रत्येकाने पक्षाभेद विसरून या महामोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,” असे जाहीर आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचे तापले असून, पोलीस प्रशासनानेही सुरक्षेच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे.
– ब्युरो रिपोर्ट, युवा प्रभाव न्यूज








