उलवे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर LED Sign हटवण्याचा प्रयत्न केल्यास परिणाम वाईट होतील; ऑल इंडिया पँथर सेनेचा सिडको आणि प्रशासनाला थेट इशारा!

101

पनवेल/उलवे (विशेष प्रतिनिधी): नवी मुंबईतील उलवे येथे अनंता टॉवरसमोर १४ एप्रिल रोजी समाज बांधवांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा भव्य LED Sign बोर्ड उभारण्यात आला आहे. पनवेल-उलवे परिसराची शोभा वाढवणारा हा मुंबई परिसरातील सर्वात मोठा LED Sign बोर्ड ठरला आहे. मात्र, आता हा बोर्ड हटवण्यासाठी काही मनुवादी प्रवृत्तींकडून सिडको प्रशासनावर दबाव आणला जात असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करत सिडको प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना तीव्र शब्दांत इशारा दिला आहे.

महामानवाच्या Sign ला हात लावला तर ‘याद राखा’!

दीपक केदार यांनी आपल्या पोस्टमध्ये अत्यंत आक्रमक भूमिका मांडली आहे. त्यांनी म्हटले आहे की, या देशाचे संविधान लिहिणाऱ्या महामानवाचा एवढा तिटकारा का? याच देशाच्या संविधानाचे संरक्षण घेऊन जगणारे काही मनुवादी आज बाबासाहेबांच्या साइन बोर्डला विरोध करत आहेत. सिडको प्रशासनाने या दबावाला बळी पडू नये. जर या महामानवाच्या नावाला किंवा साइन बोर्डला स्पर्श जरी केला, तर त्याचे वाईट परिणाम संपूर्ण मुंबई आणि पनवेलमध्ये पाहायला मिळतील. आम्ही याचा जाहीर निषेध करतो.

आमदार प्रशांत ठाकूर यांनी मनुवादी प्रवृत्तीला रोखावे

या प्रकरणात स्थानिक राजकीय नेतृत्वावरही निशाणा साधण्यात आला आहे. भाजपचे स्थानिक आमदार प्रशांत रामशेठ ठाकूर यांनी याची जाणीव ठेवावी की ते बौद्ध बांधवांच्या मतांवर निवडून येतात. त्यामुळे त्यांनी तात्काळ या मनुवादी प्रवृत्तींना रोखावे आणि सिडकोच्या माध्यमातून सुरू असलेला हा छुपा प्रयत्न थांबवावा, अशी मागणी केदार यांनी केली आहे.

तर बेकायदेशीर बांधकामे काढायला वेळ लागणार नाही!

पँथर सेनेने सिडको प्रशासनालाही थेट आव्हान दिले आहे. जर या कायदेशीर आणि सुशोभीकरणाचा भाग असलेल्या बोर्डवर कोणतीही कारवाई करण्याचे ‘नाटक’ केले, तर सिडकोच्या आशीर्वादाने संपूर्ण पनवेलमध्ये कोणकोणती बेकायदेशीर बांधकामे उभी आहेत, ती शोधून काढायला आणि ती पाडायला लावायला आम्हाला वेळ लागणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे.

मुख्यमंत्री आणि राज्य सरकारने दखल घेण्याची मागणी. 

या संवेदनशील प्रकरणामुळे उलवे आणि पनवेल परिसरात सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि राज्य सरकारने या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी पँथर सेनेकडून करण्यात आली आहे.

“ऑल इंडिया पँथर सेना मनुवाद्यांचा जाहीर निषेध करत आहे. विरोधकांची भनक लागल्यास त्याला पँथर काय असतो ते दाखवून देऊ!”

दीपक केदार (राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया पँथर सेना)

या प्रकरणानंतर उलवे परिसरातील आंबेडकरवादी आणि समाज बांधवांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली असून, प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नवनवीन आणि ताज्या अपडेट्ससाठी वाचत राहा ‘युवा प्रभाव’ – तरुण भारताचा नवा आवाज!