नवी दिल्ली : NEET परीक्षा घोटाळा आणि पेपर फुटीच्या मुद्द्यावरून देशातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियाद्वारे केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. “जेव्हा लाखो युवक रस्त्यावर उतरले आहेत आणि २२ लाख विद्यार्थ्यांचे भविष्य पणाला लागले आहे, अशा वेळी पंतप्रधानांचे मौन हे सरकार उत्तर देण्याऐवजी स्वतःचा बचाव करत असल्याचे स्पष्ट करत आहे,” असा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये थेट केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत शिक्षणमंत्री आपल्या पदाचा राजीनामा देत नाहीत आणि NEET सारख्या परीक्षांमधील पेपर लीक रोखण्यासाठी एक अत्यंत सुरक्षित आणि ‘फूलप्रूफ’ (त्रुटीरहित) यंत्रणा तयार केली जात नाही, तोपर्यंत काँग्रेस पक्ष आणि देशभरातील तरुण शांत बसणार नाहीत.
२२ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात ढकलले गेल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला असून पंतप्रधानांच्या मौनावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. इतक्या मोठ्या राष्ट्रीय मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी गप्प का, असा सवाल ह्या पोस्ट मधून राहुल गांधी यांनी केला आहे.
NEET परीक्षेतील कथित अनियमिततेमुळे देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, राहुल गांधी यांच्या या भूमिकेमुळे आता विरोधी पक्ष या मुद्द्यावरून सरकारला संसदेपासून रस्त्यापर्यंत घेरण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.









