(प्रतिक सावंत) : भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश मानला जातो. या लोकशाही व्यवस्थेचा पाया म्हणजे भारतीय राज्यघटना. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली आणि २६ जानेवारी १९५० पासून ती संपूर्ण देशात लागू करण्यात आली. भारतीय राज्यघटना ही केवळ कायद्यांचे पुस्तक नसून, ती भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे.
भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांनी राज्यघटनेच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला समान हक्क, स्वातंत्र्य आणि न्याय मिळावा यासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. राज्यघटनेत नागरिकांचे मूलभूत अधिकार, कर्तव्ये, शासनव्यवस्था, न्यायव्यवस्था आणि केंद्र-राज्य संबंध यांचा सविस्तर उल्लेख करण्यात आलेला आहे.
भारतीय राज्यघटनेची एक मोठी वैशिष्ट्य म्हणजे “मूलभूत अधिकार”. प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शिक्षणाचा अधिकार आणि धर्मस्वातंत्र्य यांसारखे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. हे अधिकार नागरिकांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत आवश्यक आहेत. तसेच राज्यघटनेत “मूलभूत कर्तव्ये” देखील नमूद करण्यात आली आहेत, ज्यामुळे नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम आणि जबाबदारीची भावना निर्माण होते.
आजच्या काळात संविधान आणि कायद्याचे ज्ञान प्रत्येक नागरिकासाठी आवश्यक झाले आहे. समाजात अनेकदा नागरिकांना त्यांच्या अधिकारांची माहिती नसते. त्यामुळे अन्याय, फसवणूक किंवा अधिकारांचा गैरवापर होण्याच्या घटना घडतात. अशा परिस्थितीत कायद्याचे प्राथमिक ज्ञान नागरिकांना सजग आणि सक्षम बनवते.
लोकशाही टिकवण्यासाठी संविधानाचा आदर आणि पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. संविधान हे केवळ न्यायालय किंवा सरकारपुरते मर्यादित नसून, ते प्रत्येक भारतीयाच्या जीवनाशी निगडित आहे. संविधानामुळेच देशात समानता, बंधुता आणि न्याय या मूल्यांचे रक्षण केले जाते.
“Law and Constitutional Corner” या कॉलम मार्फत नागरिकांना कायदे, राज्यघटना, न्यायव्यवस्था आणि सामाजिक हक्कांविषयी सोप्या भाषेत माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. समाजात कायद्याविषयी जागरूकता निर्माण करून जबाबदार नागरिक घडवणे, हाच मुख्य उद्देश असेल.
शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की,
“संविधान हे राष्ट्राचे हृदय आहे आणि कायदा हा समाजाच्या सुव्यवस्थेचा आधार आहे.”

लेखक : प्रतिक सावंत
मुंबई.
Email : p.v.s.05081991@gmail.com








