मुंबईत पुन्हा गोळीबार; भायखळ्यात तरुणावर भररस्त्यात फायरिंग..

81

मुंबईत गुन्हेगारांचे धाडस पुन्हा एकदा वाढल्याचे चित्र दिसत आहे. भायखळा परिसरात मंगळवारी संध्याकाळी अज्ञात हल्लेखोरांनी एका तरुणावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात समीर आसिफ शेख (३८) नावाचा तरुण जखमी झाला असून, त्याच्या पायाला गोळी लागली आहे. या गोळीबारामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भायखळा येथील डॉकयार्ड रोड परिसरात मंगळवारी संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास समीर शेख हा आपल्या कामात असताना अचानक हल्लेखोरांनी त्याला लक्ष्य करत गोळीबार केला. या गोळीबारात एक गोळी समीरच्या पायाला लागली आणि तो कोसळला.

या घटनेनंतर जखमी समीरला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने, गोळी पायाला लागल्याने त्याची प्रकृती सध्या स्थिर असून तो धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

या घटनेची भायखळा पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.

या गोळीबारामुळे मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.