मुंबई : २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. “काँग्रेस सेवादल” देखील संपूर्ण तयारीनिशी ह्या रणसंग्रामात राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वात उतरणार असून “महाविजय” साकारण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करून विजयश्री खेचून आणणार असे प्रतिपादन अखिल भारतीय काँग्रेस सेवादलाचे राष्ट्रीय सहसचिव व गोवा राज्य प्रभारी राकेश शेट्टी यांनी केले आहे. ते महाराष्ट्र राज्य काँग्रेस सेवादलाच्या राज्यस्तरीय कार्यकारणी बैठकीत बोलत होते. टिळक भवन येथे हि बैठक आयोजित केली होती. सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालजी देसाई यांच्या मार्गदर्शनात सेवादल देशभर उत्कृष्टपणे कार्य करत आहे. आणि प्रत्येक सेवादल जिल्हाध्यक्ष मेहनत करत असून त्यांच्या परिश्रमाचे देखील चीज होईल असा आशावाद राकेश शेट्टी यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला.

सदर बैठकीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेस सेवादलचे अध्यक्ष विलास औताडे, अखिल भारतीय काँग्रेस सेवादलाचे सचिव तथा महाराष्ट्र राज्याचे प्रभारी मंगलसिंग सोंळकी, अखिल भारतीय काँग्रेस सेवादलाचे महाराष्ट्र राज्य प्रभारी शंकरगौडा पाटील, अखिल भारतीय काँग्रेस सेवादलाचे तेलंगणा राज्य प्रभारी शशिकांत थोरात व अखिल भारतीय काँग्रेस सेवादलाचे गुजरात प्रभारी संग्राम तावडे यांनी अगामी 2019 लोकसभा निवडणूक आधी होणाऱ्या राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय कार्यशाळेची माहिती, फेब्रुवारी महिन्यात जयपुर मध्ये होणाऱ्या अखिल भारतीय काँग्रेस सेवादलाची महारॅली बाबत माहिती व पूर्व तयारी, सेवा शक्ती आणि युवा शक्ती मध्ये जास्त जास्त लोकांना सहभागी करून घेणे, राज्यामध्ये सोशल मीडियाचा विस्तार अश्या अनेक विषयांवर महाराष्ट्रतुन आलेल्या सर्व जिल्हा अध्यक्षांच मार्गदर्शन केले.

कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण करण्यात आले. सदर कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस सेवादलाच्या अध्यक्षा सौ. वृषाली ताई वाघचौरे व सेवादलाचे महाराष्ट्र राज्याचे सर्व जिल्हा अध्यक्ष उपस्थित होते.








