नवी दिल्ली – अयोध्येतील वादग्रस्त जमीन प्रकरणात सुप्रीम कोर्टातील सुनावणी आज पुढे ढकलण्यात आली. अवघ्या एका मिनिटात सुप्रीम कोर्टाच्या पीठाने निर्णय सुनावला. नवीन पीठाच्या स्थापनेसंदर्भात 10 जानेवारीला या प्रकरणी सुनावणी होणार असल्याचे कोर्टाने सांगितले आहे. हे प्रकरण चीफ जस्टीस रंजन गोगोई आणि जस्टीस संजय किशन कौल यांच्या पीठाकडे आहे. त्यांच्याकडून मोठ्या पीठाकडे हे प्रकरण पाठवले जाऊ शकते. 10 जानेवारीनंतर नवीन पीठ याच्या नव्या सुनावणीबाबत निर्णय घेईल. यापूर्वी या प्रकरणावर ऑक्टोबरमध्ये सुनावणी झाली होती.
नवीन पीठ अलाहाबाद हायकोर्टाच्या सप्टेंबर 2010 च्या निर्णयाच्या विरोधात दाखल झालेल्या 14 याचिकांवर सुनावणी करणार आहे.
लोकसभा निवडणूक जवळ आल्याने राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच तापला आहे. 2019 च्या निवडणुकीपूर्वी राम मंदिर निर्माणासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे. नुकतेच पंतप्रधानांनी स्पष्ट केले आहे की, राम मंदिराचे निर्माण घटनात्मक मार्गानेच केले जाणार आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.








